अमरावती : चांदूररेल्वे तालुक्यातील मांजरखेड येथील शाखा डाकपाल जानराव किसनराव सवई (५४) याच्याविरूद्ध ३ जानेवारी रोजी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर चौकशीला प्रारंभ झाला. तो घोटाळेबाज घोटाळा करण्याच्या सवईचा असून त्याचा हा गोरखधंदा सन १९९५ पासून सुरू असल्याचे प्राथमिक चौकशीदरम्यान उघड झाले.
याबाबत अमरावती येथील मुख्य डाकघर कार्यालयातील सहायक अधीक्षक संगीता सुभाष रस्तेसार यांनी ३ जानेवारी रोजी चांदूर रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार, जानराव सवई याने तो अपहार २४ सप्टेंबर २०१८ ते १६ जुलै २०२१ या कालावधीत केला असला तरी त्याने त्याची सुरुवात १९९५ मध्येच केली.
तक्रारीनुसार, जानराव सवईने २४ नोव्हेंबर १९९५ ते १६ जून २०१९ या कालावधीत ३४ बचतखात्यातील व सुकन्या समृद्धी खात्यातील जमा रक्कम संबंधित खात्यातून विड्रॉल केली. त्यासाठी त्याने संबंधित खातेधारकांच्या बनावट स्वाक्षरी केल्या. तथा खातेधारकांची फसवणूक करून अकाउंट बुकला संबंधित तारखेच्या नोंदी घेतल्या. वार्षिक पाहणी व लेखापरीक्षण अहवालातून हा अपहार उघड झाला. चांदूर रेल्वे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध सोमवारी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
सुकन्या समृद्धी खात्याला वाळवी
प्रत्येक पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी असते. त्यामुळेच त्यांचे शिक्षण उत्तम व्हावे आणि चांगल्या पद्धतीने त्याची वाढ व्हावी, यासाठी सर्व जण प्रयत्न करत असतात. पालकांना मुलांच्या शिक्षणासोबत त्यांच्या लग्नाचीदेखील काळजी असते. अशा गोष्टीचा विचार करून सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेत नियमित गुंतवणूक केल्यास मुलगी वयाच्या २१व्या वर्षी करोडपती बनू शकते. सुकन्या समृद्धी योजना ही सरकारची स्मॉल डिपॉझिट स्कीम आहे. त्या खात्यालाही त्याने वाळवी लावली.