राष्ट्रीय स्तरावर चार पदकांची मानकरी, अमर जाधव झाले भारतीय संघाचे प्रशिक्षक
नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : स्थानिक एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीची खेळाडू मंजिरी मनोज अलोने हिची पोलंड या देशात होणाऱ्या युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिपकरिता भारतीय संघात निवड झाली आहे.
मंजिरी अलोणे ही नांदगाव खंडेश्वर (जि. अमरावती) तालुक्यातील सावनेर येथील संत वामन महाराज विद्यालयात लिपिक पदावर कार्यरत मनोज अलोणे यांची कन्या आहे. ती सुरुवातीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होती. पण, तिचे खेळातील कौशल्य व जिद्द ओळखून पालकांनी तिला नांदगावच्या एकलव्य गुरुकुल स्कूलमध्ये दाखल केले. तीन वर्षांपासून ती एकलव्यच्या मैदानावर शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त सदानंद जाधव गुरुजी यांच्या मार्गदर्शनात सराव करत आहे. तिने तीन राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन सुवर्णपदकासह एकूण चार पदके प्राप्त केली. ती सध्या सोनिपत (हरियाणा) येथे भारतीय संघासोबत सराव शिबिर करीत आहे. ९ ते १३ ऑगस्ट दरम्यान ती पोलंडमधील स्पर्धेत सहभागी होणार आहे.
मंजिरीचे एनआयएस प्रशिक्षक अमर जाधव यांचीसुद्धा तिच्यासोबत भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. ते नांदगाव खंडेश्वर येथे महावितरणमध्ये लिपिक पदावर कार्यरत आहेत.
मंजिरीला भारतीय तिरंदाजी संघाचे सचिव प्रमोद चांदूरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, एकलव्यचे मुख्याध्यापक विलास मारोटकर, अनूप काकडे, विशाल ढवळे, राष्ट्रीय खेळाडू पवन जाधव तसेच इतर वरिष्ठ खेळाडूंचे मार्गदर्शन लाभले.