लैंगिक शोषण प्रकरण : गृहमंत्र्यांनी द्यावे लक्षअमरावती : उच्चशिक्षित शिक्षक मनोज पांडे याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप करीत विद्यार्थिनीने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. गुन्हा दाखल करण्यापूर्वीच हे प्रकरण गाडगेनगर पोलिसांना माहिती होते. मात्र, त्यावेळी याप्रकरणाकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने आरोेपी शिक्षक पांडे याला पसार होण्यास पुरेसा वेळ मिळाला. त्यामुळे पांडेला पोलिसांचा वरदहस्त तर नाही ना, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या अमरावतीत भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांनी शिक्षणांची गंगा आणली. मात्र, शिक्षणाला व्यवसाय बनविणाऱ्या काही शिक्षकांनी शिक्षकी पेशालाच काळीमा फासला आहे. कोचिंग क्लासेस चालविणाऱ्या मनोज पांडेकडे शिक्षण घेण्यासाठी विश्वासाने विद्यार्थिनी जात होत्या. मात्र, त्याच्या अशा कृत्याने शिक्षकी पेशालाच गालबोट लागले आहे. ज्ञानाचे धडे देणाऱ्या पांडेने डाव साधून चक्क एका विद्यार्थिनीची व्हिडिओ क्लिप काढून तिला धमकावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे पांडेने अन्य विद्यार्थिंनींचेही लैंगिक शोषण केल्याची शक्यता नाकारता येत नाही. जर हे खरे असेल तर, पांडे हा ‘सेक्स रॅकेट’ चालवित असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र, या संवेदनशिल प्रकरणात पोलीस कमालीचे असंवदेनशिल असल्याचे दिसून येत आहे. अटकेस विलंब का ?अमरावती : माहिती देण्यास टाळाटाळ करणे, तपासाला गती नसणे व माहितीत पारदर्शकता न ठेवण्याच्या याप्रकाराकडे आता गृहराज्यमंत्री व पोलीस आयुक्तांनीच लक्ष घालावे, असा सूरही उमटू लागला आहे. याप्रकरणी न्याय मिळावा, या अपेक्षेने पीडित मुलगी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याकडे गुन्हा दाखल होण्याच्या दोन दिवसाआधीच गेली होती. घडलेला सर्व प्रकार तिने पोलीस आयुक्तांसमक्ष मांडला. त्यामुळे याप्रकरणात लक्ष घालून गुन्हा दाखल करून आरोपीला तत्काळ अटक करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी गाडगेनगर ठाणेदारांना दिल्या. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांनी आरोपीच्या मोबाईलवर कॉल करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याचा संपर्क होऊ शकला नाही. हीसर्व प्रक्रिया गुन्हा दाखल होण्याच्या पूर्वीच घडली आहे. मात्र, पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत आहे. १ एप्रिल रोजी रात्री मनोज पांडेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. आता चार दिवस उलटून गेले आहेत. पोलिसांचे दोन पथक पांडेच्या शोधात असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, अद्याप तो पोलिसांच्या हाती लागला नाही. एखादा चोर किंवा सर्वसामान्य गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात पोलीस दिरगांई करीत नाहीत. मात्र, मनोज पांडे सारख्या उच्चशिक्षित व्यक्तीला अटक करण्यात विलंब का, हाही एक संशोधनाचा विषय आहे. लैंगिक शोषणाच्या प्रकरणात पोलिसांनी तत्परता दाखवित तपासाची सर्व सूत्रे तत्काळ हलविणे गरजेचे आहे. मात्र,अद्याप पोलिसांनी जप्त केलेले सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पाहिले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे याप्रकरणाकडे पोलीस किती गांभीर्याने बघतात, हे दिसून येत आहे.
मनोज पांडेला पोलिसांचा वरदहस्त ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2017 12:08 AM