अमरावती : १९ नोव्हेंबर रोजी घरातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला असून त्याचे शिर आणि धड वेगवेगळ्या ठिकाणी पडलेल्या स्थितीत दिसून आले. ६ डिसेंबर रोजी सकाळी ही घटना उघड झाली. विशाल गजभिये (३५, रा, कैलासनगर, महादेवखोरी) अशी मृताची ओळख पटविण्यात आली आहे.
मंगलधाम कॉलनीनजिकच्या गोवर्धन पर्वतावरील गौरक्षणाजवळच्या जंगलात त्याचे शिर झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत, तर धड त्याच ठिकाणी कुजलेल्या स्थितीत जमिनीवर आढळले. त्यावरून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.
फ्रेजरपुरा पोलीस सूत्रानुसार, मंगलधाम कॉलनीजवळून पुढे जंगलातून कुजलेला वास येत असल्याची तक्रार अज्ञाताने ११२ क्रमांकावर नोंदविली होती. त्यानुसार फ्रेजरपुराचे ठाणेदार राहुलकुमार आठवले हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. १९ नोव्हेंबर रोजी मिसिंग म्हणून नोंदविलेल्या तक्रारीतील छायाचित्र व वर्णन जुळविण्यात आले. मृताच्या कुटुंबीयांनीदेखील तेथे बोलावण्यात आले. त्यानंतर विशाल गजभिये अशी मृताची ओळख पटविण्यात आली. विशाल हा १९ नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याची तक्रार फ्रेजरपुरा पोलिसांत नोंदविण्यात आली होती.
कर्जाच्या तगाद्याने आत्मघात?
मृताच्या पत्नीच्या तक्रारीनुसार, विशाल हा बडनेरा रोड स्थित एका चारचाकी वाहन विक्री प्रतिष्ठाणात कर्मचारी होता. अलीकडे त्याच्यावर बरेच कर्ज झाले होते. अनेकजण त्याच्या घरी पैसे मागायला यायचे. त्यातून त्याला दारूची सवय लागली. त्यातूनच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.
विशालची पत्नी भातकुली येथे परिचारिका असल्याचे सांगण्यात आले. जेथे विशालचा मृतदेह आढळून आला तो भाग घनदाट जंगलाचा असून, त्याच्या घराजवळ असल्याचेदेखील सांगण्यात आले. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.