संशोधन : राजेंद्र गोडे इन्स्टिट्युट, रिसर्च टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांचा आविष्कार अमरावती : स्थानिक राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटरच्या मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनात ‘मॉडिफाईड स्विपिंग मशीन’चा शोध लावला आहे. बहुउपयोगी ठरणाऱ्या या यंत्राच्या निर्मितीसाठी विद्यार्थ्यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत. विजेचा वापर, पेट्रोलचा खर्च आणि डिझेलचे टेन्शन न बाळगता संपूर्ण शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी या महाविद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी मानवचलित स्वच्छता यंत्र (स्विपिंग मशिन) तयार केले आहे. अमरावती शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी हे उपकरण बहुउपयोगी ठरणार आहे. वर्षभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी स्वच्छ भारत मोहीम सुरू केली. हातात झाडू घेऊन प्रत्येक देशवासीयाने देश स्वच्छ करण्याचे आवाहन त्यांनी केले. या अभियानातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी शहराच्या साफसफाईसाठी हे यंत्र तयार केले आहे. शहरात ठिकठिकाणी व रस्त्यावरील कचरा उचलण्यासाठी या मॉडिफाईड यंत्राचा उपयोग होणार आहे. महाविद्यालयाचे व्ही.टी. इंगोले हे अमेरिका व सिंगापूर या देशांच्या दौैऱ्यावर असताना तेथे पाहिलेल्या महागड्या स्वच्छता यंत्रामध्ये काही बदल करून त्याच धर्तीवर कमी किंमतीचे अधिक काम करणारे यंत्र भारतातही तयार व्हावे, अशी कल्पना त्यांच्या मनात आली. यातूनच त्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देऊन हे मॉडिफाईड ‘स्विपिंग मशीन’ तयार केली. जीवनात स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची आहे. स्वच्छतेकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज असते. शहरातील कचरा साफ करण्यासाठी महापालिकेकडे महागडी उपकरणे आहेत. या मशीनच्या सहाय्याने शहर स्वच्छ होते. परंतु राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटरच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे उपकरण कमी खर्चा व अत्यंत उपयुक्त असल्याने याचा वापर केल्यास महापालिकेच्या निधीची मोठी बचत होऊ शकते. हे क्लासिफाईड यंत्र तयार करण्यासाठी व्ही.टी. इंगोले यांच्या मार्गदर्शनात प्राचार्य एस.जी. पाटील, एस.एस. दांडगे, हेमंत देशमुख, आर.एम. देसमुख, एम.पी. पाचगडे, एस.ए. देशमुख, डब्ल्यू आर. धावडे, एस.पी. पोटदुखे, स्वप्निल पाटील, सागर धवडे, गोविंद राठी, प्रदीप तागडे या अंतिम वर्ष यांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी हे यंत्र तयार केले आहे. (प्रतिनिधी)असे चालते स्वच्छता यंत्रहे यंत्र वापरण्यास अत्यंत सरळ व साधे आहे. सायकलच्या समोरील बाजूस चेनच्या सहाय्याने एक फिरता ब्रश लावण्यात आला आहे. सोबतच एका रॉडच्या सहाय्याने एक मोठी टोपलीही लावण्यात आली आहे. या फिरत्या ब्रशच्या मदतीने रस्त्यावरील कचरा या टोपलीत जमा होतो. एरवी झाडूने झाडल्यानंतर उडणारा कचरा नाकातोंडात जाऊन सफाई कामगारांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या यंत्राच्या वापरामुळे टळणार आहेत. कमी मनुष्यबळात आणि अधिकाधिक स्वच्छतेचे काम या यंत्राद्वारे केले जाईल.
मानवचलित ‘मॉडिफाईड स्विपिंग मशीन’
By admin | Published: December 02, 2015 12:14 AM