- संदीप मानकर
अमरावती - मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस चांगला असला व आजच्या तारखेपर्यंत धरणात जास्त पाणीसाठा असला तरी २४ आॅगस्टपर्यंत सरासरी ७५ टक्क््यांपेक्षा जास्त पाणीसाठा राहायला हवा होता. पण, पश्चिम विदर्भातील ४९९ प्रकल्पांची सरासरी ५८.०२ टक्के आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प पावसाच्या प्रतीक्षेत असून, तेथील १०५ प्रकल्पांमध्ये फक्त १३.६९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने चिंता वाढली आहे. विभागातील पाचही जिल्ह्यांतील मोठे, मध्यम व लघू असे एकूण ४९९ प्रकल्पांतील संकल्पित पाणीसाठा हा ३२८३.६३ दलघमी आहे. आजचा पाणीसाठा हा १९०५.०९ दलघमी आहे. शेकडो प्रकल्पांच्या पाणीसाठ्याची स्थिती ही बिकट आहे. उन्हाळयात अनेक जिल्ह्यात पाणीटंचाईची झड पोहचू शकते. २४ आॅगस्टपर्यंत अमरावती जिल्ह्यामधील ८४ प्रकल्पांमध्ये ४८.९० टक्के पाणीसाठा आहे. सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस न पडल्यास जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही. मागील वर्षी ४१.१६ टक्के होता. यामध्ये अप्पर वर्धामधून अमरावती शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. या प्रकल्पात फक्त ४६.८८ टक्के पाणीसाठा आहे. दोन आठवड्यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने व नद्यांना पूरसुद्धा आल्याने जिल्ह्यातील ११८ प्रकल्पात ८०.२६ टक्के प्रकल्प भरले आहेत. मागील वर्षी बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला २७.८४ टक्केच पाणीसाठा शिल्लक होता. यंदा जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये ७५.३७ टक्के पाणीसाठा आहे. अकोला जिल्ह्यातील ४६ प्रकल्पात ६६.६५ टक्के भरले आहेत. मागील वर्षी २०.९२ टक्के पाणीसाठा होता. येथील दोन मोठ्या प्रकल्पांची स्थिती यंदा चांगली आहे. मात्र, मध्यम प्रकल्प ५८ टक्के भरले आहेत. वाशिम जिल्ह्यातील १४६ प्रकल्पाची टक्केवारी ७१.४६ टक्के आहे. मागील वर्षी फक्त १५.६५ टक्के होती. बुलडाणा जिल्ह्याची यंदा स्थिती फारच खराब असून, १०५ प्रकल्पांमध्ये सरासरी १३.६९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. येथील तीन मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त ८.९७ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षीसुद्धा हीच परिस्थिती होती. १६.८४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
बुलडाण्यातील मध्यम प्रकल्पांची स्थिती गंभीर बुलडाणा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये असलेल्या मध्यम प्रकल्पांचीही स्थिती गंभीर असून, सात मध्यम प्रकल्पांमध्ये १८.४७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांची स्थिती चांगली असून, सद्यस्थितीत चार मध्यम प्रकल्पांमध्ये ६०.९८ टक्के पाणीसाठा आहे. अकोल्यात चार प्रकल्पांमध्ये ५८.४८ टक्के, तर वाशिममध्ये तीन प्रकल्पांत ९१.१४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
जिल्हा प्रकल्प पाणीसाठा सरासरी टक्केवारीअमरावती ८४- ४८.९० यवतमाळ ११८- ८०.२६अकोला ४६- ६६.६५वाशिम १४६ - ७१.४६बुलढाणा १०५ - १३.६९एकूण ४९९- ५८.०२
महिन्याभरात चांगला पावसाची प्रतीक्षा आहे. काही प्रकल्प अपेक्षित नियोजनानुसार भरले नाहीत, तर आॅक्टोबरमध्ये आढावा घेऊन अनेक जिल्ह्यांत प्रकल्पांमधील पाणीसाठा पिण्यासाठी राखून ठेवला जाईल. - रवींद्र लांडेकर, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग