लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : राज्यातील मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या संपूर्ण मागण्या मान्य करण्यासाठी शहरात मराठा क्रांती मोर्चा गुरुवारी सकाळी १० वाजता जयस्तंभ चौक येथून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरांसह ग्रामीण भागातील युवक-युवती, महिला भगिनींसह मराठा पुरुषांनी मोठ्या प्रमाणात जयस्तंभ चौक येथे एकत्र येऊन शोकसभा घेतली. गोदावरी नदीमध्ये जलसमाधी घेणारे काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सरकारविरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शहरातून भव्य मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यामध्ये गोदावरी नदीमध्ये काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतलेल्या पुलाचे ‘मराठा हुतात्मा काकासाहेब शिंदे’ असे नामकरण करण्यात यावे, मराठा समाजाला त्वरित आरक्षण जाहीर करावे, प्रशासनाने मुख्यमंत्र्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, मुख्यमंत्र्यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू कराव्या, तामिळनाडू राज्याप्रमाणे आरक्षण लागू करण्यात यावे, वैद्यकीय प्रवेशासंबंधी केंद्र शासनाने २७ टक्के जागा कायम ठेवावी, मेगा भरती सुरू करण्यापूर्वी मराठ्यांंचे आरक्षण लागू करण्यात यावे आदींचा त्यात उल्लेख होता.
परतवाड्यात निघाला मराठा क्रांती मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 1:30 AM
राज्यातील मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या संपूर्ण मागण्या मान्य करण्यासाठी शहरात मराठा क्रांती मोर्चा गुरुवारी सकाळी १० वाजता जयस्तंभ चौक येथून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.
ठळक मुद्देश्रद्धांजली, ठिय्या आणि मोर्चा : एसडीओंना निवेदन