प्रवीण गायकवाड : मराठा आरक्षण हवेच, १४ डिसेंबरला नागपुरात महामोर्चाअमरावती : राज्याच्या ३५ जिल्ह्यांसह जगातल्या १८ देशांमध्ये मराठ्यांचे मूकमोर्चे निघालेत. राज्यात तर तीन कोटी मराठे एकत्र आलेत. जगाने नोंद घेतली. आतापर्यंतच्या मूकमोर्चाचे रेकॉर्ड ३.५० लाखांचे होते. मात्र मराठ्यांच्या मोर्चांनी ते रेकॉर्ड केव्हांचेच मोडले असून मोर्चे मूक होते, संख्या मात्र बोलकी असल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केले. सकल मराठा समाजाच्यावतीने सोमवारी येथील मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख व्याख्यानमाला घेण्यात आली. त्यात ‘मराठा मोर्चामागील असंतोषाची कारणे’ या विषयावर प्रवीण गायकवाड बोलत होते. व्याख्यानमालेचे उद्घाटक म्हणून आ. यशोमती ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. वीरेंद्र जगताप होते. व्यासपीठावर जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अरविंद गावंडे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मोहिते, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा मयुरा देशमुख, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष उमाकांत तेटू, तिरळे कुणबी समाजाचे रमेश आळे, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे हेमंत देशमुख यांची उपस्थिती होती. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजानंतर तब्बल २७ वर्ष मराठे नेतृत्वाविना लढले. तंजावरपासून पेशावरपर्यंत राज्य निर्माण केले. त्यामुळे मराठ्यांच्या नेतृत्वावर कुणीही शंका घेण्याचे कारण नाही. मात्र आज आर्थिक हलाखीमुळे मराठ्यांची परिस्थिती बेताची झाली आहे. त्या अनुषंगाने राज्यभर नव्हे, तर देशभर निघालेल्या मोर्चांमध्ये आम्ही २२ मागण्या मांडल्या. त्या मागण्यांचा तांत्रिक, कायदेशीर आणि घटनात्मक अभ्यास करण्यासाठी आम्ही तज्ज्ञ समिती नेमली असून १४ डिसेंबरच्या मोर्चाच्या निवेदनानंतर सरकारला उणिव काढण्यास संधीच राहणार नाही, असे गायकवाड म्हणाले. मराठा मोर्चाची दखल जगाने घेतली आहे. जगाच्या पाठीवर अभूतपूर्व मूकमोर्चा असे नामानिधान या मोर्चाने मिळविले असून मराठ्यांमधील खदखद या मोर्चातून रस्त्यावर आल्याचे ते म्हणाले. तर मराठा आरक्षण वास्तव आणि गरज या विषयावर बोलताना याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणाची कायदेशीर बाजू मांडली. मराठा मोर्चानंतर अॅट्रॉसिटी प्रकरणामध्ये कमी आली असून हक्काच्या शिक्षणासाठी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. शेती तोट्याची होणे, हे मराठ्यांच्या माघारण्याचे मुख्य कारण असल्याचे आ. वीरेंद्र जगताप म्हणाले तर आ. यशोमती ठाकूर यांनी मराठ्यांनी स्पिरीट जोपासले पाहिजे, नेमके काय करावयाचे आहे ते ठामपणे ठरविले पाहिजे, अशी भूमिका मांडली.
मराठ्यांचे मोर्चे मूक, संख्या मात्र बोलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2016 12:14 AM