अमरावती : राज्यात मराठा आरक्षणासाठी रान पेटले असतानाच अमरावती महापालिकेतील सत्तापक्ष असलेल्या भाजपच्या नगरसेविका जयश्री विजयराव डहाके यांनीही नगरसेवकपदाचा राजीनामा गटनेत्याकडे सोपविला आहे. त्यांच्या या राजीनाम्याने राज्यातील राजीनामा सत्राची धग अमरावती शहरातही पोहोचल्याचे दिसून येते. मराठा आरक्षणाच्या नावावर सध्या चालढकल सुरू आहे. जिल्ह्यात अभूतपूर्व झालेल्या मराठा क्रांती मोर्चानंतर ही धग वाढतच आहे.
नगरसेविका डहाके यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राजीनामा दिला असल्याची कबुली महापौर संजय नरवणे यांनी दिली. मात्र, तो आपल्यापर्यंत आलेला नाही, असेही ते म्हणाले. राज्यातील कुणबी व मराठा समाजाला आरक्षण मिळावे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात येऊन स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी. मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणाऱ्या आठ मराठा युवकांनी जिवाचे बलीदान देऊन मराठा समाजाचा ज्वलंत प्रश्न तातडीने सोडविण्याची गरज असल्याचे दाखवून दिले. त्यामुळेच समाजहितासाठी आपले योगदान व कर्तव्य समजून महापालिका सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचे जयश्री डहाके यांनी प्रसिद्धीपत्रात नमूद केले आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
आंदोलनाला मिळणार ताकदमराठा आरक्षणाचा विषय अत्यंत गंभीर व तेवढाच महत्त्वाचा आहे. या आंदोलनाबाबत एक व्यक्ती, गट व समाज म्हणून सर्वांचे एकमत आहे. या आंदोलनाला अधिकाधिक ताकद द्याल, अशी अपेक्षा नगरसेविका जयश्री डहाके यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. याबाबत महापालिकेचे गटनेता सुनील काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी डहाके यांच्या राजीनाम्याबाबत दुजोरा दिला.