अमरावती : केंद्र शासनाच्या शेतकरीविराेधी कायद्याविरुद्ध लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देत आहेत. या आंदोलनाच्या समर्थनार्थ सोमवारी मराठा सेवा संघ व इतर पक्षांतर्फे जिल्हाकचेरी समोर अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
अन्नधान्य, फळ, दूध हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. परंतु याचा उत्पादनकर्ता शेतकरी आज संकटात आहे. सरकारकडून तो दुर्लक्षित झाला आहे. दिल्ली येथील शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. म्हणून या आंदोलनकर्त्यांचे मनोबल वाढविणे व सरकारवर दबाब आणून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी समाजातील सर्व संघटनांनी शेतकऱ्यांनी व सर्व जनतेच्या सहभागातून हा सत्याग्रह करण्यात आला. शेती हा राज्यांचा विषय आहे. शिवाय पर्यायी बाजार आताही महाराष्ट्रासहीत अनेक राज्यांत सुरू आहेत. त्यामुळे शेतमालाची विक्री पणन व्यवस्थेतील सुधारणांसाठी नवे, तसेच किचकट आणि जागोजागी आक्षेप घेण्यालायक कायदे इतक्या घाईघाईने आणण्याची गरज नव्हती. केंद्राने केलेले कायदे पूर्णत: शेतकरीविरोधी असून ते मागे घेण्यात यावे, अशी मागणी मराठा सेवा संघ व अन्य इतर समकक्षांनी केली आहे. आंदोलनात मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अश्विन चाैधरी, सचिव संजय ठाकरे, चंद्रकात मोहिते, प्रभाकर वानखडे, अरविंद अढाऊ, प्रफुल्ल गुडधे, श्रीकृष्ण बोचे, अरविंद गावंडे, गणेश वसुृ, पंडित काळे, मनाली तायडे, प्रतिभा रोडे, अश्विनी देवके, शीला पाटील, हर्षा ढोके, सुभाष देशमुख, मयुरा देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.