अमरावती : मराठा आरक्षणासाठी आॅगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. दरम्यान, मराठा युवकांनी मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दुपारच्या सुमारास बोरगाव धर्माळे येथे राष्ट्रीय महामार्ग रोखला. या रास्ता रोको आंदोलनामुळे अर्धा तास वाहनांची चाके थांबली. त्यामुळे पोलीस प्रशासनाची एकच तारांबळ उडाली.नागपूर महामार्गावरील रास्ता आंदोलनात शेकडो युवकांनी सहभाग घेतला होता. ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘आरक्षण नाही कुणाच्या बापाचे, ते आमच्या हक्काचे’ अशा घोषणाबाजीने युवकांनी आसमंत दणाणून सोडला. प्रारंभी मराठा युवक येथील राजकमल चौकात एकत्र आले. त्यानंतर दुपारी १ वाजताच्या सुमारास युवकांनी मोटरसायकलने राष्ट्रीय महामार्ग गाठले. नांदगाव पेठ परिसरातील व्यापारी प्रतिष्ठाने अगोदरच बंद असल्यामुळे युवकांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. अर्धा तासभर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. टोल नाक्यावर वाहनांची गर्दी झाल्याने पोलिसांची दमझाक झाली. नांदगावपेठचे ठाणेदार कैलास पुंडकर हे घटनास्थळी पोहोचले. आंदोलक युवकांची त्यांनी समजूत काढली. नांदगाव पेठसह महामार्गावरील सर्व प्रतिष्ठाने, दुकाने बंद असल्याबाबत पोलिसांनी आश्वस्त केले. यानंतर मराठा युवकांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार नारेबाजी करीत शासनविरोधात घोषणा दिल्या.
मराठा युवकांनी रोखला राष्ट्रीय महामार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 1:23 AM