पान ३ चे लिड
अमरावती : जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी १ जूनपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तथापि, या निर्बंधांमध्ये काही बाबींसंदर्भात अंशत: बदल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्व कृषिउत्पन्न बाजार समित्या, घाऊक बाजापेठा, मोठ्या बाजारपेठा, भाजी मार्केट येथे किरकोळ व चिल्लर विक्रेते यांना परवानगी अनुज्ञेय राहील. ग्राहकांना मात्र थेट जाता येणार नाही. विक्रेत्यांना दुचाकी या वाहनतळावरच उभ्या कराव्या लागतील. शक्य झाल्यास सायकलचा वापर करावा, असे निर्देश ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत सोमवारी उशिरा जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
दोन टन क्षमता असणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीची उपरोक्त परिसरातून परवानगी अनुज्ञेय राहील. त्यापेक्षा जास्त भारवहन क्षमतेच्या वाहनांना या परिसरातून सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतूक करण्यास मनाई राहील. जिल्ह्यातील सर्व कृषिउत्पन्न बाजार समिती, घाऊक बाजापेठा, मोठ्या बाजारपेठा यांनी त्यांच्या स्तरावर सुरक्षा रक्षक नेमून स्थानिक स्वराज्य संस्थांसमवेत समन्वय ठेवून गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. गर्दीचे विकेंद्रीकरण करावे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आहेत.
बॉक्स
घराजवळील दुकानातून करा खरेदी
सामान्य ग्राहक असलेल्या नागरिकांनी जवळच्या अतिपरिचित दुकानातून खरेदी करावी. इतवारा बाजार, सक्करसाथ अशाप्रकारे जिल्ह्यातील कुठल्याही घाऊक बाजारपेठेमध्ये ग्राहकांना थेट खरेदी करण्याकरिता प्रवेश नाही. वरीलप्रमाणे निर्देशांचे महापालिका आयुक्त, नगरपरिषद मुख्याधिकारी, नगरपालिका आदींनी पोलीस विभाग, कृषिउत्पन्न बाजार समिती व व्यापारी संघटना यांच्यासमवेत समन्वय साधून नियोजन व अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.