फोटो पी २२ पुसला
पुसला : कोरोना प्रादुर्भाव टाळण्याकरिता पुसल्यातील भाजी बाजार आठवड्यातून तीन दिवस भरविण्याचा निर्णय स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. बाहेरून येणाऱ्या भाजी विक्रेत्यांना बाजारात गर्दी होऊ नये म्हणून बाहेरून येणाऱ्या विक्रेत्यांना परत गावी पाठविले आहे. बाजारात विक्रेत्यांनी नियम न पाळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्याचा इशारा ग्रामपंचायत प्रशासनाने दिला आहे.
अलीकडे वरूड तालुक्यात कोरोना संसर्ग वाढत असून, गावात सुध्दा रुग्ण वाढतच आहे. त्यामुळे गावातील बिकट परिस्थिती निर्माण होत आहे. आठवडी बाजार मागील महिन्यापासून बंद करण्यात आला. परंतु दुसऱ्या दिवशीसुध्दा बाजाराला आठवडी बाजाराचे स्वरूप येत होते. अखेर गावात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाजीपाला बाजार आता आठवड्यातून तीन दिवस भरविण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. गावातील भाजी विक्रेत्यांना सूचना देण्यात आल्या आहे. बाजारात गर्दीत टाळण्याकरिता बाहेर गावातील भाजी विक्रेत्यांना बाजारात दुकान थाटण्याकरिता रोखले असून केवळ गावातील भाजी विक्रेत्यांना दुकान थाटण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बाहेर गावातील फळ भाजीपाला विक्रेत्यांना बसस्टँडवरून परत पाठवले आहे. कोरोना नियंत्रणाकरिता शासनाने ठरवून दिलेल्या त्रिसूत्री नियम फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर व मास्क न वापरल्यास भाजी विक्रेत्यांना व ग्राहकांना दंडात्मक कार्यवाही करणार असल्याचे सरपंच धनराज बमनोटे यांनी सांगितले.