लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांनी निर्मिती केलेल्या वस्तू विक्री आणि प्रदर्शनीचे उद्घाटन कारागृह प्रशासनाचे उपमहानिरीक्षक योेगेश देसाई यांच्या हस्ते मंगळवारी पार पडले. प्रदर्शनीत विविध साहित्य बघून पाषाण भिंतीच्या आत गुन्हेगारी हाताने आता कौशल्याकडे वाटचाल केल्याचे दिसून येते.स्थानिक कारागृह वसाहत परिसरात चांदूररेल्वे मार्गालगत बंदीजनांनी तयार केलेल्या विविध वस्तू विक्री स्टॉल सुरू करण्यात आले आहे. यात घरगुती वापराच्या साहित्यासह सागवान पलंग, एलईडी दिव्यांचा समावेश आहे. शासकीय दरानुसार हे साहित्य विकले जात असून मिळणारे उत्पन्नातून बंदीजनांना रोजगार दिला जातो. एकंदरित स्टॉलवर ठेवण्यात आलेल्या वस्तू या बंदीजनांचे कौशल्य, कलाकुसरीचा नमुना असल्याचे स्पष्ट होते. कारागृहाच्या कारखाना विभागात वेगवेगळ्या प्रशिक्षणातून तयार केलेल्या वस्तूंची प्रदर्शनी दिवाळी सणाचे औचित्य साधून लावण्यात आली आहे. महिला बंदीच्या हातून तयार ज्युट बॅग, कुशन माफक दरात विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच सागवान देव्हारा, टी-पॉय, चौरंग, आराम खुर्ची, पोळपाट, चावी स्टॅन्ड, कॅप स्टॅन्ड, कासव पानदान, विपश्यना व योगा आसन पट्टी, एलईडी लाईट यासह पलंग, पाट, सन टॉप टेबल, टी पॉय सागवान पट्टी फोल्डर, फुलदानी, मोबाईल स्टॅन्ड आदी सागवानपासून तयार केलेल्या वस्तू लक्ष वेधून घेत आहेत. कारागृहाचे अधीक्षक रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनात २५ ते ३० बंदीजन विविध वस्तू तयार करून रोजगार मिळवीत आहे.कारागृह हे सुधारगृह असून बंदीजनांनी पुन्हा त्याने गुन्ह्याकडे वळू नये, यासाठी वस्तू निर्मिती कौशल्याचे प्रशिक्षण त्यांना दिले जाते. दिवाळी पर्वात वस्तू प्रदर्शनी, विक्री मागील उद्देश ऐवढाच की कारागृहात नेमके काय शिकविले जाते, हे लोकांसमोर यावे.- योगेश देसाई, उपमहानिरीक्षक,कारागृह प्रशासन
बंदीजनांच्या कौशल्याचे मार्केटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:45 PM
येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांनी निर्मिती केलेल्या वस्तू विक्री आणि प्रदर्शनीचे उद्घाटन कारागृह प्रशासनाचे उपमहानिरीक्षक योेगेश देसाई यांच्या हस्ते मंगळवारी पार पडले.
ठळक मुद्देवस्तू विक्री,प्रदर्शनीचे उद्घाटन : कारागृह उपमहानिरीक्षकांची उपस्थिती