अमरावती : कोरोना संसर्गामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. मात्र, राज्य शासनाने दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित केली असून, प्रत्येक शाळांना विद्यार्थ्यांचे गुण ऑनलाईन पाठवावे लागेल. याशिवाय गुणांची हार्डकॉपी विभागीय शिक्षण मंडळाकडे पाठविणे अनिवार्य राहील.
शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ साठी इयत्ता दहावीच्या परीक्षांचे मू्ल्यमापन निश्चित करण्यात आले आहे. ११ ते ३० जून या कालावधीत शाळांची जबाबदारी, विषय निहाय शिक्षकांचे कर्तव्य, प्रत्यक्ष निकाल, निकाल समिती आणि मुख्याध्यापकांचे कर्तव्य आदी बाबी राज्य शिक्षण मंडळाने निश्चित केले आहे. इयता नववी आणि दहावीच्या आधारे विद्यार्थ्यांना गुण द्यावे लागणार आहे. शाळांना एकत्रित गुण केल्यानंतर ते मुख्याध्यपकांना लिंकद्धारे ऑनलाईन पाठवावे लागेल. ही सर्व प्रक्रिया ३० जूनपर्यंत करावी लागणार आहे. याशिवाय एकत्रित शाळानिहाय दहावीच्या गुणांची यादी, विद्यार्थ्यांचे नाव, आसन क्रमांकांची हॉर्ड कॉपी मुख्याध्यापकांना बोर्डाकडे पाठवावी लागेल. राज्य शिक्षण मंडळाने विषयनिहाय गुण देणे आणि निकालाबाबतचे मार्गदर्शन शिक्षकांसाठी यू ट्युबवर उपलब्ध आहे.
--------------------
१५ जुलैनंतर दहावीचा निकाल जाहीर होणार
११ ते ३० जून या कालावधीत शाळांना दहावीच्या गुणांबाबत प्रक्रिया करावी लागणार आहे. ३० जूनपर्यंत विभागीय मंडळाकडे गुणांसह आवश्यक माहिती आल्यानंतर ही माहिती राज्य शिक्षण मंडळाकडे ३ जुलैपर्यंत रवाना करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे गुण तपासणे, गुणपत्रिका तयार करणे, छपाई करणे आदी प्रक्रिया आरंभली जाणार आहे. साधारणत: १५ जुलैनंतर दहावीचा निकाल जाहीर होण्याचे संकेत आहेत.
-------------------
विभागात दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या
अकोला: २६९७७
अमरावती: ४०६६३
बुलडाणा : ३९६५८
यवतमाळ : ३८०४५
वाशिम: १९७१५
---------
राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षांची मूल्यमापनाची कार्यपद्धत निश्चित केली आहे. त्यामुळे वेळापत्रकानुसार शाळांना कार्यवाही करून ३० जूनपर्यंत गुण ऑनलाईन पाठविण्यासह हॉर्ड कॉपी द्यावी लागेल. त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल.
- शरद गोसावी, अध्यक्ष, विभागीय शिक्षण मंडळ