अमरावती : तालुक्यातील कुसुमकोट येथे २६ मे २०२२ रोजी लग्नाचा मंडप सजला. पाहुणे आले. नवरीही सजली. पण आक्रितच घडले. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने नवरा मुलगा बोहल्यावर चढलाच नाही. पाच लाखांसाठी तो ठाम राहिल्याने उपवधूने थेट पोलीस ठाणे गाठले. नवरदेव व त्याच्या भावाविरुद्ध हुंडा बंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल झाला. नवरदेव लग्न न लावताच गावी परतला. तालुक्यात प्रथमच अशी घटना घडली आहे.
धारणी शहरातील नवरदेवाचे पाच किलोमीटर अंतरावरील कुसुमकोट बु. या गावात लग्न ठरले. प्रथेप्रमाणे नवरदेवाला मारुतीच्या मंदिरात घेऊन गेले. तिथून नवरदेवाला नवरीच्या मंडपात यायचे होते. मात्र, वडील नसल्याने कर्ताधर्ता असलेला मोठा भाऊ येत नाही तोपर्यंत लग्न मंडपात येणार नाही, अशी भूमिका नवरदेवाने घेतली. तसे बयाण त्याने पोलिसांना दिले. त्यामुळे दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान नवरदेव आणि नवरी लग्नाच्या पेहरावातच पोलीस स्टेशनमध्ये आले. नवरदेव आणि त्याच्या मोठ्या भावाने वधू पक्षाकडून नवीन घराच्या सामानासाठी रुपये पाच लाख हुंड्याची मागणी केली आणि ती मागणी पूर्ण न झाल्यामुळे नवरदेवाने लग्नास नकार दिल्याची तक्रार उशिरा रात्री पोलिसात दाखल केली. ठाणेदार सुरेंद्र बेलखडे पुढील तपास करीत आहेत.
रात्र पोलीस कोठडीेत
धारणी पोलिसांनी २६ मे रोजी रात्री ८ च्या सुमारास नवरदेव आणि त्याच्या मोठ्या भावाविरुद्ध हुंडा प्रतिबंधक अधिनियमांतर्गत कलम ४ अन्वये गुन्हा दाखल केला. दोन्ही भावांना अटक करून गुरुवारची रात्र पोलीस कोठडीत काढावी लागली. २७ मे रोजी प्रथम श्रेणी न्यायालय धारणी येथे उपस्थित करण्यात आले. तेथे दोघांची जामिनावर सुटका करण्यात आली.