अमरावती : ‘एकदा भेट, मेसेज तरी कर, असे फोनवरून बजावून एका २८ वर्षीय तरुणीचा पाठलाग करण्यात आला. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी मयुर दिलीप बोरकर (रा. महादेवखोरी) विरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पीडिताशी लग्नाची बोलणी सुरू असताना आरोपीचे अन्य एक मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याचेदेखील उघड झाले.
तक्रारीनुसार, १ जानेवारी २०१६ रोजी अमरावती पुणे प्रवासादरम्यान, पिडिताची आरोपीशी ओळख झाली. त्यानंतर पीडिताचा मोबाईल क्रमांक मिळवून आरोपीने तिच्याशी बोलणे सुरू केले. काही दिवसांनी आरोपीने प्रेमाचा इजहार केला. लग्न करू, असे म्हणून तिच्याशी प्रेमालाप वाढविला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांकडून लग्नाची बोलणीदेखील सुरू झाली. पीडितानेदेखील लग्नाबाबत बोलणी केली. त्यानंतर काही दिवसांनी आरोपीचे दुसऱ्या मुलीसोबत अफेअर सुरू असल्याची माहिती पीडिताला मिळाली. त्यातच आरोपी हा काहीच कामधंदा करत नसल्याने पीडिताने आरोपीशी बोलचाल बंद केली. मात्र, त्यानंतरही आरोपीने पाठलाग केला. एकदा भेट, असे संदेश तिला टाकले. फोन करून तिला वारंवार त्रास दिला. आरोपी एवढ्यावरच न थांबता त्याने पीडिता जेथे खासगी नोकरी करते, त्याठिकाणी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० च्या सुमारास हा प्रकार घडला. त्यामुळे ती प्रचंड त्रासली. त्यामुळे १६ ऑगस्ट रोजी पीडिताने फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठून आरोपी मयूर बोरकर याच्याविरूद्ध तक्रार नोंदविली.
कोट
संबंधित महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. १५ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास आरोपीने तक्रारकर्तीचा पाठलाग केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
- सोनाली मेश्राम,
सहायक पोलीस निरीक्षक,
फ्रेजरपुरा ठाणे