परंपरेला फाटा : कोरोना संक्रमण कमी झाल्याने प्रत्यक्ष पूजा-अर्चा
अमरावती : यावर्षी कोरोना संकटामुळे साऱ्याच सण-समारंभ, सांस्कृतिक वा धार्मिक कार्यक्रमांवर बंधने घालण्यात आली आहेत. पितृपक्षातील पंधरवड्यावरही त्याचे सावट होते. एरवी तलाव, नदी किंवा पवित्र स्थळी होणारा पिंडदानाचा कार्यक्रम यंदा घरगुती स्वरूपातच केला जात आहे. विवाह, सत्यनारायण, तेरवी, पिंडदानाचे कार्यक्रमदेखील यंदा व्हर्च्युअल वा ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.
लोकांनी ऑनलाईन पूजेला जास्त प्राधान्य दिले आहे. व्हर्च्युअल श्राद्धविधी करून लोकांनी कोरोनाकाळात बाहेर पडणे टाळले, तर कोरोनाबाधितांच्या मृत्यूनंतरचे विधी एकत्र न येता ऑनलाईन पद्धतीने केवळ पुजारी वा महाराज ठरवून करण्यात आले. अमरावतीच्या तुलनेत मोठ्या महानगरांमध्ये पितृपक्षामध्ये श्राद्ध विधींसाठी बूकिंग, वेगवेगळ्या दिवसांसाठीच्या श्राद्ध विधींसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन ब्राह्मण बूक करणे, वर्षश्राद्ध, श्राद्धविधी, भरणी श्राद्ध, सर्वपित्री अमावास्या, ब्राम्हण भोजन असे विधी ऑनलाईन करण्याकडे अनेकांचा कल राहिला.
बॉक्स
कोरोना कमी झाल्याने प्रत्यक्ष पूजा
पंधरवड्यापासून कोरोनाचा कहर कमी झाल्याने आता प्रत्यक्ष स्थळावर, मंदिर, पूजास्थळी जाऊन पूजा घातली जात आहे. त्यामुळे ऑनलाईन विधीला तूर्तास ब्रेक लागला आहे.
----------
पूजेला आले तरी मास्क
पूजेला आले तरी सर्व पूजाऱ्यांच्या चेहऱ्याला मास्क अनिवार्य आहे. एखाद्या पुजाऱ्याने चेहऱ्यावर मास्क घातला नसेल, तर यजमानांकडून तशी सूचना वजा विनंती केली जाते. मास्क नसेलच तरी तोंडावर दुपट्टा बांधण्याचा आग्रह केला जातो.
-------------
काय म्हणतात विधी करणारे?
लग्नस्थळी प्रत्यक्षात जाऊन विधी केले. मात्र, वर-वधू व त्यांच्या मामांशिवाय तेथे गर्दीला थारा नव्हता. दीड वर्षांपासून मास्कचे बंधन स्वत:लाच घालून दिले. अमरावती शहरात ऑनलाईन विधीला मर्यादा होत्या.
- लक्ष्मीकांत जोशी, केडियानगर
२) ऑनलाईन असो वा ऑफलाईन, पूजाविधीला मास्क बंधनकारकच होता. ऑनलाईन पूजेला मर्यादा येतात. आता फिजिकल डिस्टन्सिंग राखून ऑफलाईन पूजेला सुरुवात झाली आहे.
- राजेश ताठे, महावीरनगर