लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : एका २७ वर्षीय विवाहितेने अपार्टमेंटच्या चौथ्या माळ्यावरील फ्लॅटच्या गॅलरीतून उडी घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना ९ डिसेंबर रोजी पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान घडली होती. याप्रकरणी मृत विवाहितेच्या पित्याच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी ११ डिसेंबर रोजी रात्री ११:३० च्या सुमारास मृताच्या पतीसह सासरा व एका महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
आरती (२७, रा. पार्वतीनगर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. मृताचा पती ऋषिकेश प्रमोद चौधरी (३०), प्रमोद पुंडलिकराव चौधरी (५५) व एक महिला (सर्व रा. बल्लाळेश्वर अपार्टमेंट, पार्वतीनगर नंबर २) यांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. आरती या पती व कुटुंबासह पार्वतीनगर येथील अपार्टमेंटमध्ये चौथ्या माळ्यावर राहत होत्या. रविवारी मध्यरात्रीनंतर त्यांनी आपल्या फ्लॅटच्या गॅलरीतून उडी घेतली. त्या थेट खाली उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांवर कोसळल्या. त्यामुळे मोठा आवाज झाला. हा प्रकार आरती यांच्या पतीच्या लक्षात आल्यावर त्यांनी अपार्टमेंटमधील रहिवाशांच्या मदतीने त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु सोमवारी दुपारी उपचारादरम्यान आरती यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळाल्यावर खोलापुरी गेट पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
याप्रकरणी मृत आरती यांच्या पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र त्यानंतर मृताचे वडील शंकर काळे (५९, रा. मारूड, ता. जि. पांढुर्णा) यांनी खोलापुरी गेट पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.
काय आहे तक्रारीत?एफआयआरनुसार, आरती यांचे मे २०२३ मध्ये ऋषिकेशशी लग्न झाले होते. लग्नाच्या दोन महिन्यांनी ऋषिकेश हा दारू पिऊन घरी येऊ लागला. तो तिला मारहाणदेखील करत होता. वडिलांनी हुंडा दिला नाही, असे म्हणून तो शारीरिक व मानसिक त्रास देत होता. मुलीला त्रास होऊ नये म्हणून शंकर काळे यांनी आरोपींना दीड लाख रुपये दिले. मात्र त्यानंतरदेखील त्यांनी मुलीला त्रास देणे सुरूच ठेवले होते. सासू, सासरेदेखील हुंड्यासाठी टोमणे मारत होते. त्या त्रासाला कंटाळून आपल्या मुलीने चौथ्या माळ्यावरून उडी मारली व ती उपचारादरम्यान मरण पावली, असे काळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.