अमरावती: आपल्या विवाहित बहिणीचे कुठेतरी प्रेमसुत जुळल्याची शंका तिच्या भावाला आली. त्याने फोन कॉल करण्याचे निमित्त करून बहिणीचा मोबाईल चेक केला. त्यावेळी त्याला विवाहित बहिणीचे तिच्या तथाकथित बॉयफ्रेंडसोबत असलेले फोटो व आक्षेपार्ह चॅटिंग दिसले. त्यामुळे तो भडकला. बहिण भावामध्ये चांगलीच तू तू मै मै झाली. रागातच ती पोटच्या तीन वर्षीय मुलाला सोबत घेऊन आत्महत्येसाठी छत्री तलावाकडे निघाली. ती माहिती मिळताच राजापेठ पोलीस तातडीने तिकडे पोहोचले. मुलासह उडी घेण्याच्या बेतात असलेल्या त्या २४ वर्षीय विवाहितेला पोलिसांनी थांबविले. तिला आत्महत्येपासून परावृत्त केले. येथील छत्री तलाव परिसरात रविवारी दुपारी २ ते २.१५ च्या सुमारास हा प्रसंग घडला.
राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका २४ वर्षीय विवाहित महिलेने पोटच्या गोळ्यासह आत्महत्येसाठी छत्री तलाव गाठला. पोलिसांनी तिचे प्राण वाचवून तब्बल पाच तास तिचे समुपदेशन केले. तिच्या भावाला समजून सांगण्यात आले. तर, तिच्या कथित प्रियकराला देखील चार ते पाच तास राजापेठ ठाण्यात चौकशीसाठी थांबावे लागले. राजापेठ पोलिसांनुसार, शेजारच्या परिसरात राहणारी विवाहित बहिण भरकटल्याची कुणकुण भावाला लागली. रविवारी दुपारी तो बहिणीकडे गेला. तेथे त्याने बहिणीचा मोबाईल चेक केला. त्यात दिसलेल्या फोटो व सोशल मिडियावरील चॅटिंगमुळे त्याची शंका सत्यात उतरली. त्याने बहिणीला किमान पती व चिमुकल्याकडे बघ. तुझा सोन्यासारखा संसार आहे, तो का विस्कटत आहेस, तुला शोभते काय, अशी प्रश्नांची सरबत्ती त्याने बहिणीवर केली. नाद सोड, असे बजावत तो बहिणीच्या घरून बाहेर पडला.म्हणून घेतला तिने निर्णय
आता भावाला माहित झाले. ते त्याने जावयाला व आईवडिलांना सांगितल्यास आपण माहेर व सासर अशा दोन्ही बाजूंकडून दूर होऊ, अशी भीती तिला वाटली. तिने दुपारी १.४५ च्या सुमारास तीन ते साडे तीन वर्षाच्या पोटच्या मुलाला कडेवर घेतले. व ती छत्री तलाव मार्गाने पायदळ निघाली. मधात तिने तिच्या कथित बॉयफ्रेंडला फोन केला. भावाने दरडावल्याचे सांगून त्याला आपण आत्महत्येसाठी निघाल्याचे सांगत ‘बाय’ केला.
त्यानेच दिली पोलिसांना वर्दीएक महिला तिच्या चिमुकल्यासह आत्महत्या करण्यास निघाल्याची माहिती तिच्याच कथित बॉयफ्रेंडने राजापेठ पोलिसांना दिली. ठाणेदार मनीष ठाकरे यांनी तातडीने बिट मार्शलना तेथे पाठविले. तथा उडी घेण्याच्या बेतात असलेल्या त्या महिलेला सुखरूप पोलीस ठाण्यात आणण्यात आले. एक दोन मिनिटांचा उशिर झाला असता, तर अनर्थ घडला असता, आपण अगोदर मुलाला फेकणार होता, त्यानंतर स्वत: उडी घेणार होता, असे तिने रडवेल्या सुरात पोलिसांना सांगितले. दुपारी २.३० ते ७.३० पर्यंत ठाकरे व महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिचे समुपदेशन केले.