पान १
अमरावती: फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंधरवड्यात खुनाची नकोशी हॅट्रीक घडली. सबब ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांना तडकाफडकी पोलीस नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले, तर वाहतूक शाखेचे निरीक्षक प्रवीण काळे या तरुण तुर्काकडे फ्रेजरपुरा या अतिसंवेदनशील ठाण्याचा सुकाणू सोपविण्यात आला. गुरुवारी उशिरा रात्री पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी त्याबाबत आदेश काढले.
फ्रेजरपुरा भागातील सिद्धार्थ क्रीडा मंडळासमोर गुरुवारी दुपारी चौघांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अनिकेत कोकणे या १७ वर्षीय तरुणाला आयुष्यातून उठवले. फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील हा तिसरा खून ठरला. मोतीनगर चौकात झालेल्या अंशुल इंदूरकर हत्याकांडानंतरच मेश्राम यांची बदली केली जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. ती गुरुवारच्या घटनेने प्रत्यक्षात उतरली आहे. दरम्यान, फ्रेजरपुरा ठाण्यात अतिरिक्त बीट मार्शल देण्यात आले आहेत. घटनेच्या वेळी ते नेमके कुठे होते, त्याची चौकशी करण्यात येत आहे.
मेश्राम करणार होते दोन वर्षे पूर्ण!
फ्रेजरपुरा ठाणेदार म्हणून पुंडलिक मेश्राम यांनी २१ सप्टेंबर २०१९ मध्ये प्रभार स्वीकारला होता. ते आता तेथील कार्यभाराचे दोन वर्षे पूर्ण करणार होते. त्यापूर्वीच खुनाची चौथी घटना घडली. त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली.
फ्रेजरपुरा हद्दीत एका महिन्यात चार हत्या
फ्रेजरपुरा हद्दीत ऋतिक बेलेकर (२०) याचा जुन्या भांडणाच्या कारणातून खून करण्यात आला. ६ जुलै रोजी ती घटना घडली. त्यात सहा आरोपींना अटक करण्यात आली. २२ जुलै रोजी प्रणय सातनुरकर (२२, रा. महादेवखोरी) याची महादेवखोरी भागात हत्या करण्यात आली. मोतीनगर भागात २६ जुलै रोजी अंशुल इंदूरकर (१८, कल्याणनगर) याचीदेखील हत्या करण्यात आली. खुनाच्या चारही घटना जुन्या वैमनस्यातून घडल्या.