अमरावती : कोरोनाकाळातील लॉकडाऊनमध्ये रुग्णालयात काम मिळवून देण्याची बतावणी करून तीन जणांनी एका महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भानखेडाच्या जंगलात घडली होती. या प्रकरणात फ्रेजरपुरा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस सूत्रांनुसार, धीरज रमेश सोळुंके (३४), प्रफुल्ल भगवान म्हनसकर (२०) (दोन्ही रा. कहला, खानापूर) आणि चेतन प्रवीण खंडार उर्फ देशमुख (३०, रा. नांदगाव खंडेश्वर) अशी आरोपींची नावे आहेत. फ्रेजरपुरा हद्दीत राहणारी ३० वर्षीय तक्रारदार महिला घरकाम करते. लॉकडाऊनमुळे तिचे काम बंद होते. यादरम्यान धीरज सोळुंकेने महिलेला फोन करून एका दवाखान्यात साफसफाईचे काम असल्याचे सांगितले. महिलेने त्याला होकार दिला. १ एप्रिल रोजी ती महिला यशोदानगर चौकात धीरजला भेटण्यासाठी गेली. त्यावेळी धीरजने तिला जबरीने दुचाकीवर बसवून भानखेडा रोडवरील जंगलात नेले. तेथे धीरजपाठोपाठ प्रफुल्ल आणि चेतन खंडार हेसुद्धा पोहोचले. तेथील एका ओळखीतील व्यक्तीच्या शेतातील खोलीत नेऊन तिघांनीही आळीपाळीने महिलेवर बलात्कार केला. यादरम्यान धीरजने त्याचा व्हिडिओ बनवून फेसबूकवर अपलोड करण्याची धमकी दिली. त्याच्या बळावर त्यानंतरही ३ ते ४ वेळा आरोपींनी लैंगिक अत्याचार केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.