आली होळी, मेळघाटात मग्रारोहयोचे वेतनच नाही
परतवाडा : अवघ्या १५ दिवसांवर मेळघाटातील आदिवासींचा सर्वात मोठा होळी सण असताना मग्रारोहयो अंतर्गत कामे करणाऱ्या मजुरांना वेतनच मिळाले नाही. धारणी व चिखलदरा तालुक्यातील जवळपास चार कोटी रुपयांचे वेतन अडकले आहेत. दुसरीकडे कामासाठी शेकडो मैल दूर स्थलांतरित झालेले मजुरांचे जत्थे गावी परतू लागले आहेत.
मेळघाटच्या धारणी चिखलदरा तालुक्यातील आदिवासींचा सर्वात मोठा सण होळी. या सणाची ते वर्षभर वाट पाहतात. अंगमेहनतीची कामे करण्यासाठी मुंबई, नागपूर, भोपाळ, इंदूर, पुणे, नगर या बड्या शहरांसह कर्नाटक, राजस्थान, दिल्ली या परराज्यातसुद्धा जातात. जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतीतील पीक कापणीसाठी हजारो मजुरांची मागणी आहे. एकंदर आदिवासी मजुरांचे स्थलांतर होऊ नये, यासाठी प्रशासन ग्रामपंचायतनिहाय गावात शासनाच्या विविध यंत्रणांमार्फत मग्रारोहयोअंतर्गत कामे उघडली जातात. परंतु, ती कामे कमी पडत असल्याने आदिवासी नेहमीप्रमाणे रोजंदारी व पीक कापणीतील काही हिस्सा मिळण्याच्या आशेने स्थलांतरित होत असल्याचे सत्य आहे.
बॉक्स
मुलाबाळांसह पाठीवर बि-हाड घेऊन परतू लागले
तान्हुल्या मुलांसह पाठीवर बि-हाड घेऊन रोजंदारीच्या शोधात दूरपर्यंत गेलेले आदिवासी होळी या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या सणासाठी आता परतू लागले आहेत. परतवाडा येथील सार्वजिनक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह परिसरात एकत्र येत ते पाड्यांमध्ये परत जायला सुरुवात झाली आहे. यादरम्यान परतवाडा शहरातून होळी सणासाठी परिवारातील लहानापासून वृद्धापर्यंत परिधान, किराणा व इतर आवश्यक साहित्य खरेदी करतात.
बॉक्स
मग्रारोहयोचे वेतन केव्हा? आमदारांचे निवेदन
मग्रारोहयो अंतर्गत काम केलेल्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील शेकडो आदिवासी मजुरांना तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. यासंदर्भात त्यांनी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्याकडे तक्रार केल्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान रोजगार हमी योजना मंत्र्यांकडे होळी या सणापूर्वी आदिवासींचे वेतन देण्याची मागणी केली आहे.
बॉक्स
कोरोनात होळीचा रंग फिका
वर्षभरापासून देशभर सुरू असलेल्या लॉकडाऊनची झळ ग्रामीण भागातील आदिवासींनाही सोसावी लागत आहे. होळीच्या कालावधीत कुठल्याच कामावर न जाता नाच-गाणे करीत पंचपक्वान, मोहाची दारू, मटण, भात पुरी असे खाद्य पदार्थ ते बनवितात. मात्र यंदा त्यांच्या आनंदावर कोरोनाचे सावट आहे.
---
पान ३ साठी