लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : बांगलादेशातील हिंदू, अल्पसंख्याक जैन, बौद्ध, शीख यांच्यावर होत असलेले भ्याड हल्ले, हत्या आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तेथे मालमत्तेची लूट आणि महिलांवरील अत्याचार, अशा घटना गंभीर आणि चिंताजनक बनल्या आहेत. या सुनियोजित हल्ल्यांमुळे बांगलादेशातील जीवन असुरक्षित झाले आहे. या सर्व घटनांच्या निषेधार्थ मंगळवारी सायंकाळी ४ वाजता अमरावती शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री तथा भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण पोटे-पाटील यांनी केले.
बांगलादेशातील या अत्याचारांचा कायदेशीरपणे विरोध करणाऱ्या 'इस्कॉन'चे प्रमुख स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या खोट्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. ही घटना बांगलादेशातील हिंदूचा आवाज दडपण्याचा प्रयत्न आहे. बांगलादेशात हिंदू, शीख, जैन, बौद्ध समाजावर होणाऱ्या अत्याचारविरोधात सकल हिंदू समाज व भारतीय जनता पार्टी अमरावती शहरतर्फे अमरावती येथे निषेध मोर्चा काढण्यात आला.
बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, यात हिंदू शीख, बौद्ध जैन समाजातील महिलांवर अत्याचार, हत्या, संपत्ती लूटवर बांगलादेश सरकार कठोर कारवाई करत नाही. तसेच इस्कॉन मंदिराचे प. पू. स्वामी चिन्मय कृष्णदासजी महाराज यांना विनाकारण कारावासात डांबून ठेवण्याच्या विरोधात मंगळवारी सकल हिंदू समाजाच्यावतीने आयोजित निषेध मोर्चामध्ये बांगलादेश सरकारचा निषेध करत असून, हिंदूवरील अत्याचार थांबवावे, असे प्रतिपादन भाजप अमरावती शहराध्यक्ष प्रवीण पोटे- पाटील यांनी केले. यावेळी प. पू. संदीप मुनी जैन महंत, प.पू. संत राजेशलाल साहेब, प.पू, नित्य हरिनाम प्रभुजी इस्कॉन, ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज पातशे तसेच विश्व हिंदू परिषदेचे विभाग संघटनमंत्री बंटी पारवानी मंचावर उपस्थित होते. मुख्य वक्ता प्रा.डॉ. सतीश चाफले यांच्यासह प्रदेश सचिव जयंत डेहनकर, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, माजी खासदार नवनीत राणा, आमदार राजेश वानखडे, आमदार केवलराम काळे, रवींद्र खांडेकर, चेतन पवार, प्रशांत शेगोकार, सतीश करेसिया, विवेक कलोती, अनिता राज, सुरेखा लुंगारे, गंगाताई खारकर आदी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पोस्टकार्ड पाठविण्याचे अभियान राबविणार बांगलादेशच्या निषेध व्यक्त करण्याकरिता पोस्ट कार्ड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाल रंगाच्या पेनाने हस्ताक्षरात पत्र लिहून पाठविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. हे अभियान १० ते २१ डिसेंबर पर्यंत १ लाखापेक्षा जास्त पत्र पाठवून निषेध व्यक्त करण्याकरिता अमरावतीतील हिंदू, शीख, बौद्ध, जैन समाजाने सामील होऊन, हे अभियान राबवावे, असे आवाहन प्रवीण पोटे-पाटील यांनी केले.