अमरावती : शारदानगरातील बहुचर्चित चार वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरणातील मास्टर माइंड असलेला कुख्यात इसार शेख ऊर्फ टकलू व त्याचा साथीदार अज्जू याला राजापेठ पोलिसांनी शनिवारी गुजरात राज्यातून अमरावतीत आणले. मात्र, कोरोना चाचणी केल्यानंतर टकलू हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे पोलिसांनी आरोपी अज्जूला न्यायालयासमोर हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दोन दिवसांपूर्वी राजापेठ ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दत्ता मंढाळे यांचे पथक टकलू व अज्जूला प्रॉडक्शन वाॅरंटवर ताब्यात घेण्यासाठी गुजरातला रवाना झाले होते. तेथील कायदेशीर प्रक्रिया पार पाडून पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना अमरावतीत आणल्यानंतर त्यांची कोविड-१९ ची तपासणी करण्यात आली. त्यात आरोपी टकलू हा पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे त्याला कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याच्या संपर्कातील पोलीस पथक आता क्वॉरंटाईन झाले आहे. त्यांची पाच दिवसांनंतर कोरोना चाचणी केली जाणार असल्याची माहिती ठाणेदार मनीष ठाकरे यांनी दिली.
बॉक्स
आतापर्यंत १० आरोपींना अटक
चार वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी केली होती. गुजरात राज्यातील एका बिल्डरचे अपहरण व खंडणी प्रकरणात तेथे अपहरण करणाऱ्या टोळीला अटक केली होती. त्यात अज्जू व टकलूसुद्धा समावेश होता. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केल्यामुळे आता आरोपींची संख्या १० झाली आहे. अज्जूच्या पीसीआर दरम्यान आणखी या प्रकरणाचे धागेदोर उलगडले जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.