नरेंद्र जावरे
अमरावती : मेळघाटात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो. चेरापुंजीची आठवण करून देणाऱ्या या पावसात डांबरीकरणाच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे होतात. ते घाटवळणावर अपघाताला आमंत्रण देणारे, जिवावर बेतणारे ठरतात. त्यावर उपाय म्हणून मुंबईसह बड्या शहरात वापरल्या जाणाऱ्या ‘मास्टिक अस्फाल्ट’चा वापर प्रथमच मेळघाटच्या घाटवळणांवर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात आला आहे. हा प्रयोग रस्त्याचे आयुष्य वाढविणारा आणि सर्वसामान्यांना अपघातापासून वाचवणारा ठरणार आहे.
परतवाडा-चिखलदरा आणि चिखलदरा-घटांग हा रस्ता हायब्रीड ॲन्युईटी अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण बनविण्यात आला. या रस्त्यावर वळणाच्या जागी जिथे डांबरी सरफेस वारंवार उघडा पडतो, त्या ठिकाणी मास्टिक अस्फाल्ट ही वैशिष्ट्यपूर्ण प्रक्रिया करण्यात आली. यामध्ये विशिष्ट प्रकारचे डांबर व खडी यांचे मिक्सर करून ते प्रत्यक्ष जागेवर रस्त्यावर थरानुसार अंथरले जाते. त्यामुळे रस्त्याच्या वेअरिंग कोडची घनता व आयुर्मान वाढते तसेच वाहन घसरण्याच्या प्रक्रियेस आळा बसतो. याशिवाय या रस्त्यावर सुरक्षेसाठी लोखंडी कठडे, सुरक्षा भिंती, पट्टे, कॅट आय डेलिनेटर्स आदी विविध गोष्टी बसवण्यात आलेल्या आहेत. एकूणच हा रस्ता पर्यटनाच्या दृष्टीने सुरक्षित आणि सोयीस्कर करण्यात आला आहे.
परतवाडा-चिखलदरा रस्त्याने जाणारी आणि चिखलदरा-घटांग या रस्त्याने येणारी ट्रॅफिक सुरक्षित करावी, अशी यात अपेक्षा आहे. घाटवळणाचे दोन्हीही रस्ते सुरक्षित आणि सुंदर बनवण्यात आले आहेत. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता गिरीश जोशी, अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूरचे कार्यकारी अभियंता कृणाल पिंजरकर, चिखलदराचे उपविभागीय अभियंता मिलिंद पाटणकर, शाखा अभियंता हेमकांत पटारे व त्यांच्या सर्व चमूने विशेष परिश्रम घेतले.
व्याघ्र प्रकल्प आणि देवाचा धावा
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची सीमारेषा वाढल्यानंतर अंतर्गत रस्त्यांच्या परवानगीसाठी वनविभागाच्या अडचणी उभ्या ठाकल्या. त्या पार करून कामे करण्यात आली आहेत. चिखलदरा विदर्भाचे पर्यटनस्थळ असल्याने लाखो पर्यटक येथे येतात; मात्र रस्त्याअभावी अनेकांची निराशा होत होती.
असा आहे हा प्रयोग
आयएस ७०२ १९८८ नुसार बनविलेले ८५/२५ दर्जाचे डांबर आणि ७०२० मायक्रॉनमधला बारीक चुना प्रत्यक्ष साइटवर एकत्र मिक्स केला जातो. हे मिक्सिंग करण्यासाठी साईटवरच विशिष्ट यंत्रणा उभी केली जाते. या पद्धतीचे काम मुंबई शहरात आणि मोठ्या रस्त्यांवर केलेले आढळते.
मेळघाटातील रस्त्यांची मुसळधार पावसामुळे चाळण होते. परिणामी रस्त्याचे आयुर्मान वाढावे, पर्यटकांसह नागरिकांचा अपघातापासून बचाव व्हावा, यासाठी मुंबईसह इतर ठिकाणी केली जाणारी ही प्रक्रिया पहिल्यांदा चिखलदरा मार्गावर करण्यात आली आहे.
- गिरीश जोशी, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती