अमरावती : कोरोना संसर्गामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले होते. परंतु कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सभा पूर्वीप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात होणार आहेत. यासाठी ग्रामविकास विभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे तब्बल आठ महिन्यांनंतर सभागृहातील सामना आता रंगणार आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्यावतीने विविध उपाययोजना आखण्यात येत होत्या. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभा तसेच विविध विषय समित्यांच्या बैठका ऑनलाईन घेण्याचे आदेश शासनाने दिले होते. यासंदर्भात २५ ऑगस्ट रोजी सर्व जिल्हा परिषदांना पत्र प्राप्त झाले होते. या निर्णयामुळे जिल्हा परिषदेत नाराजी पसरली होती. मात्र, शासनाचे आदेश असल्यामुळे यावर प्रशासनाने ठाम भूमिका घेत आतापर्यंत ऑनलाईन सभा घेण्यात आल्यात. परंतु ऑनलाईन सभांमुळे अनेक सदस्यांना आपले प्रश्न मांडताना विविध अडचणींचा सामना करावा लागला. यात प्रामुख्याने मेळघाटसह अन्य गावांत मोबाईलची रेंज नसल्यामुळे अनेकांना सहभागी होता आले नाही. परिणामी झेडपी सभा सभागृहात घेण्याची मागणी काही झेडपींनी शासनाकडे केली होती. याची शासनाने दखल घेत आता झेडपी, पंचायत समितीच्या सभा कोरोनासंदर्भात दिलेल्या नियमांचे पालन करून घेण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे आगामी सभेत विविध मुद्यांवर पदाधिकारी, सदस्य व अधिकारी यांच्यातील सामना पूर्वीप्रमाणे रंगणार आहे. त्यामुळे या सभेत विभागप्रमुखांना सदस्यांना धारेवर धरण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे सदस्यांच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांनाही अभ्यास करून उत्तरे द्यावी लागणार आहे.