अमरावती : येथील पीडीएमसी हॉस्पिटलमध्ये नवजात बाळासह त्याच्या मातेचाही मृत्यू झाल्याने येथे काही वेळ तणाव निर्माण झाला. नातेवाईकांनी नवजात बाळ व आईचे शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याने काहीकाळ नातेवाईक व पीडीएमसी रुग्णालयातील डॉक्टरांनामध्ये बाचाबाची झाली. अखेर गाडगेनगर पोलीस व काही सामाजिक कार्यकर्ते पीडीएमसीत दाखल झाल्यानंतर नातेवाईकांना शांत करण्यात आले. ही घटना सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली.
तब्बसुम फतिमा मोहमद सादीक (२५, रा. नागपुरीगेट पोलीस स्टेशन मागे) असे मृताचे नाव आहे. सदर महिलेचा मृत्यू शनिवारी झाला. त्यापूर्वी तिचे सिझेरीयन झाले होते. तिने मृत बाळाला जन्म दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, महिलासुद्धा दगावल्याने दोघांचेही शवविच्छेदन करण्यात येऊ नये, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. नियमानुसार शवविच्छेदन करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनास्थळावर गाडगेनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमलेसह पोलिसांचा ताफा पोहचला.
कोट
महिलेचा ५ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. मात्र, नियमानुसार मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवावा लागतो. परंतु नातेवाईकांनी शवविच्छेदन करू नये, अशी भूमिका घेतली. त्यानंतर त्यांची समजून काढण्यात आली.
- आसाराम चोरमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे
कोट
आमच्याकडे महिला गंभीर अवस्थेतच शुक्रवारी दाखल झाली. तिला सारी हा आजार होता तसेच सॅचुरेशन फारच कमी होते. मात्र ती गर्भवती असल्याने तिचे सिझर करण्यात आले. परंतू बाळ स्टीलबर्थ (मृत) निघाले. शनिवारी महिला सुद्धा दगावली. नियमानुसार शवविच्छदेन करणे गरजेचे होते.
अनिल देशमुख ,डीन पीडीएमसी.