आठवणींचा ठेवा : हरविलेले वृक्ष शोधण्यासाठी प्रशासनाची धावपळनरेंद्र जावरे चिखलदरामेळघाटच्या आठवणीचा ठेवा, सन्मानाने सत्काराखातीर दिलेले ‘मोहा’चे रोपटे राजभवनात लागणार आहे. मात्र राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना आमझरी या गावात दिलेले रोपटे एका डी. बी. कारमध्ये गेल्याने ते रोपटे शोधण्याची मोहीम प्रशासनाला राबवावी लागली. चिखलदरा पर्यटन स्थळावर राज्यपाल सी विद्यासागर राव विविध कार्यक्रमानिमित्त उपस्थित होते. त्यांनी मेळघाटच्या विविध समस्या जाणून घेतल्या. मोथा, आमझरीसह येथील कॉफी मळे, गावीलगड किल्ला, पंचबोल पॉर्इंटला भेटी दिल्या.आमझरी येथे इकोटुरीझम अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपालांनी आदिवासीसोबत संवादसुद्धा साधला. यावेळी वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक संजय गौड यांनी आमझरी येथील कार्यक्रमात राज्यपालांचे स्वागत करण्यासाठी मेळघाटातील कल्पवृक्ष असलेल्या ‘मोहवृक्ष’ भेट देऊन केले. सोबत इतर अधिकाऱ्यांचेही त्याच पद्धतीने स्वागत करण्यात आले. भेट दिलेली वस्तू राज्यपालांच्या दिमतीला असलेल्या कर्मचाऱ्यांची असते. राज्यपालांच्या ताफ्यात सोबतच्या कर्मचाऱ्यांसाठी अॅम्बेसिडर कार तैनात होती. त्या कारमध्ये राज्यपालांना सत्काराखातीर दिलेले वृक्षसुद्धा ठेवण्यात आले होते. मात्र मंगळवारी राज्यपाल हेलिकॉप्टरने अमरावती येथे आले. त्यांच्या दिमतीचे अधिकारी सायंकाळी अंबा एक्सप्रेसने मुंबई जाणार आहेत. त्यादरम्यान त्यांनी सर्व साहित्य गोळा करायला सुरुवात केली. मात्र ‘मोहा’ वृक्ष दिसत नसल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मोहा वृक्षाची शोधमोहीम राबविली. अखेर ती अॅम्बेसिडर कारच अमरावती निघून गेल्याचा शोध लागला. राज्यपालांचे मेळघाट दौऱ्यातील पी.आर.ओ. तथा अचलपूरचे उपविभागीय अधिकारी श्यामकांत म्हस्के, तहसीलदार राजीव सुराडकर यांच्यापुढे राजभवनातील कर्मचारी संजय रॉय, सुधीर माळवेकर, मायकर आदींनी व्यथा मंडली. धिरगंभीर या कर्मचाऱ्यांची व्यथा पाहता या उपरोक्त अधिकाऱ्यांची सूत्रे हलवीत त्या हरविलेल्या मोहवृक्षाचा शोध लावला आणि ती व्यवस्थित असल्याची सुखद बातमी मिळताच या कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. हे वृक्ष राजभवनात लावणार !राज्यपाल राव राजभवनात पोहोचल्यावर सर्व विचारणा करत असल्याची माहिती रत्नाकर मायकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. हे वृक्ष राजभवनात लावण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
राजभवनात लागणार मेळघाटातील मोहाचे कल्पवृक्ष
By admin | Published: November 04, 2015 12:19 AM