लोकमत न्यूज नेटवर्ककुऱ्हा : भरधाव मालवाहू वाहनाने दिलेल्या धडकेनंतर दुचाकीवरील महिला तिच्या चार वर्षीय चिमुकल्यासह पुलावरून वर्धा नदीच्या पात्रात फेकली गेल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कौंडण्यपूर येथे घडली. त्या महिलेस नदीपात्राबाहेर काढण्यात आले. चिमकुला स्वराज पाण्यात वाहून गेला. त्याचा शोध घेण्यासाठी बोटीचे साहाय्य घेण्यात आले आहे. तथापि, वृत्त लिहिस्तोवर त्या चिमुकल्याचा थांगपत्ता लागला नव्हता. या घटनेत गंभीररीत्या जखमी झालेल्या विभा राजूरकर व त्यांच्या विराज या जुळ्या मुलास आर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे.चांदूररेल्वे येथील रहिवासी असलेल्या विभा दिवाकर राजूरकर (३५) या त्यांच्या चार वर्षीय विराज व स्वराज या जुळ्या मुलांसमवेत भाऊ नीलेश रमेश डहाके यांच्याकडे जळगाव बेलोरा येथे गेल्या होत्या. बहीण विभा व दोन भाच्यांना दुचाकीवर घेऊन नीलेश गुरुवारी सायंकाळी चांदूर रेल्वेकडे निघाला.दरम्यान, कौंडण्यपूर येथील वर्धा नदीच्या पुलावर नीलेशच्या दुचाकीस एमएच ०१ एल ४५०९ या क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. त्या धडकेने नीलेश व विराज हे दुचाकीसह पुलाच्या कठड्यावर जाऊन पडले, तर विभा व स्वराज कठड्यावरून नदीपात्रात फेकले गेले. अपघात घडताच नीलेश बेशुद्ध झाला. दरम्यानच्या कालावधीत अवघ्या १५ मिनिटांत विभा राजूरकर यांना तेथे असलेल्या बोटीच्या साहाय्याने नदीपात्राबाहेर काढण्यात आले. मात्र, स्वराज पाण्याच्या जलद प्रवाहात वाहून गेला. त्याला शोधण्यासाठी बचावकार्य आरंभण्यात आले आहे. बोटीच्या साहाय्याने गुरुवारी अंधार होईपर्यंत त्याचा शोध घेण्यात आला.अपघातानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत कलकोटवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्र झाल्यामुळे बचावकार्य थांबविण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली. शुक्रवारी पहाटेपासून पुन्हा स्वराजचा शोध घेतला जाणार आहे. आर्वी व तिवसा पोलीस संयुक्तरीत्या बचावकार्य करीत आहेत.पुलाच्या कठड्याला दुचाकी धडकली. यानंतर एका मुलासह आई पुलाखालून वर्धा नदीपात्रात पडली. महिलेला वाचवण्यात आले; मात्र मुलगा पाण्यात वाहून गेला. त्याचा शोध बोटीच्या साहाय्याने घेण्यात आला. रात्री मदतकार्य थांबले. शुक्रवारी सकाळी रेस्क्यू टीमच्या साहाय्याने पुन्हा शोध घेण्यात येणार आहे.- प्रशांत कलकोटवार,पोलीस उपनिरीक्षक, कुºहा
मायलेक नदीपात्रात कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 1:10 AM
भरधाव मालवाहू वाहनाने दिलेल्या धडकेनंतर दुचाकीवरील महिला तिच्या चार वर्षीय चिमुकल्यासह पुलावरून वर्धा नदीच्या पात्रात फेकली गेल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कौंडण्यपूर येथे घडली. त्या महिलेस नदीपात्राबाहेर काढण्यात आले.
ठळक मुद्देचिमुकला वाहून गेला : दुचाकीला जड वाहनाची धडक, कौंडण्यपूर पुलावरील अपघात