अमरावती : महापौर चेतन गावंडे व आयुक्त प्रशांत रोडे यांनी बुधवारी शहरातील आयसोलेशन दवाखाना व मोदी हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचारी व नागरिकांशी संवाद साधला. आपली काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. आशा वर्कर यांच्याशी यावेळी चर्चा केली. लसीकरणाची माहिती जाणून घेतली. गृहभेटी दरम्यान लसीकरणाचीही माहिती घ्यावी तसेच लसीकरणासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याची सूचना केली. १ एप्रिलपासून ४५ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांचेही लसीकरण करण्यात येत आहे. ज्या नागरिकांची नोंदणी होत नसेल त्यांनी केंद्रावर जाऊन नोंदणी करून लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. केंद्र शासनाचा ११ एप्रिलपासून लस महोत्सव सुरू झाला असून, अधिकाधिक नागरिकांना लस देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. लस केंद्रावर नागरिकांनी नोंद करून लस घ्यावी. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकप्रकारे मदतच होणार आहे. यावेळी सभागृहनेता तुषार भारतीय, नगरसेवक राजेश साहू, बलदेव बजाज, शहर अभियंता रवींद्र पवार, डॉ. देवेंद्र गुल्हाणे, डॉ. शारदा टेकाडे, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, उद्यान अधीक्षक मुकुंद राऊत, उपअभियंता श्रीरंग तायडे, अभियंता लक्ष्मण पावडे उपस्थित होते.
बॉक्स
पंचसूत्रीशिवाय पर्याय नाही
मास्क, सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचा वापर, चाचणी व लसीकरण ही पंचसूत्री पाळल्याशिवाय पर्याय नाही ते सर्वांनी पाळायलाच पाहिजे. शहरात लसीकरण केंद्र तयार करण्यात आले असून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी त्वरित लस घेऊन या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन आयुक्त प्रशांत रोडे यांनी यावेळी केले.