अमरावती : ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत प्रदूूषण टाळण्याचा संदेश देण्यासाठी महापौर चेतन गावंडे व आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बुधवारी शहरात सायकल रॅली काढून अभियानाचा समारोप करण्यात आला.
महापालिकेत २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत माझी वसुंधरा अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत आठवड्यातील दर बुधवारी ‘सायकल डे’ म्हणून पाळण्यात आला. या अभियानाचा समारोप बुधवारी सायकल फेरीने झाला. ही जनजागृती रॅली श्याम चौकातून सुरू झाल्यानंतर जुना मोटर स्टँड, बापट चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक अशी मार्गक्रमण करीत महापालिकेच्या प्रांगणात आली व येथे समारोप झाला. महापालिकेचे कर्मचारी नंदकिशोर पवार व दिलीप गाढवे यांनी निरंतर सायकलचा वापर करून महापालिकेत सेवा दिल्याबद्दल त्यांचा रोपटे व स्मृतिचिन्हाने सत्कार करण्यात आला.
आरोग्य व पर्यावरण संवर्धानाच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला. अधिनस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांसह परिसरातील किमान पाच नागरिकांना याचे महत्त्व पटवून अभियानाची व्याप्ती वाढविली. या अभियानात उपमहापौर कुसूम साहू, स्थायी समिती सभापती शिरिष रासने, सभागृह नेता तुषार भारतीय, विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, गटनेता राजेंद्र तायडे, गटनेता चेतन पवार, नगरसेवक विलास इंगोले, उपायुक्त सुरेश पाटील, उपायुक्त रवि पवार, पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख, सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, कार्यकारी अभियंता सुहास चव्हाण, पशुशल्य चिकित्सक सचिन बोंन्द्रे, उद्यान अधीक्षक मुकुंद राऊत, समाज विकास अधिकारी धनंजय शिंदे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बॉक्स
शास्वत निसर्गपूरक जीवन पद्धतीसाठी अभियान
प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित व निर्सगाशी संबंधित माझी वसुंधरा अभियान राबविण्यात आले. यात पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वावर आधारित शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले होते. सायकल चालविल्यामुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात फायदा झाला, शारीरिक व्यायामही झाला व वाहतुकीच्या कोंडीतून सुटका मिळाल्याचे महापौर चेतन गावंडे म्हणाले.