अमरावती : महापौर चरणजित कौर नंदा यांच्या प्रभागात डुकरांचा अचानक मृत्यू होऊ लागला आहे. जागोजागी मृत वराहांचे कळपच्या कळप पडून असल्याने मनुष्यांच्या आरोग्यासाठी ही बाब धोकादायक ठरणारी असल्याने महापौर चिंताग्रस्त झाल्या आहेत. सोमवारी यासंदर्भात महापौरांनी आरोग्य विभागाची बैठक बोलावून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.शहरात वराहांचा हैदोस ही नित्याची बाब आहे. मात्र, आता महापौरांच्या प्रभागातच एका पाठोपाठ एक डुकरांचा मृत्यू होऊ लागला आहे. दरदिवशी सात ते आठ वराह मृत्यूमुखी पडत असल्याच्या तक्रारी महापौर नंदा यांच्याकडे प्राप्त होत आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून मरण पावलेली डुकरे कुजत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. कुजल्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे या मृत डुकरांची विल्हेवाट लावण्यासाठी आता महापौरांना घटनास्थळी धाव घ्यावी लागत आहे. साईनगर, अकोली परिसरात अचानक डुकरांचा मृत्यू कशामुळे होत आहे, याची कारणे जाणून घेण्यासाठी महापौर नंदा यांनी सोमवारी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मृत डुकरांचे विच्छेदन करुन मृत्यूच्या कारणांचा शोध घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना महापौरांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ही बाब गांभीर्याने न घेतल्यास कठोर कारवाई केली जाईल, अशी तंंबी देखील त्यांनी दिली. साईनगरात जंगल परिसरात डुकरे मृत्यूमुखी पडल्याचे आढळून येत आहे. मृत डुकरांच्या दुर्गंधीमुळे नागरिक स्वाईन फ्ल्यूच्या धोक्याने धास्तावले आहेत. येत्या दोन दिवसांत या मृत डुकरांच्या त्रासापासून सुटका व्हावी, त्याअुनषंगाने आरोग्य विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश महापौरांनी दिले आहेत. मृत डुक्करांपासून बचावासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही महापौरांनी केले आहे. शवविच्छेदन करण्याचे आदेश : नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहनवराह पालकांची बैठक घेणारसाईनगर, अकोली परिसरच नव्हे तर संजय गांधी, यशोदानगर परिसरातही मृत डुकरांचे कळपच्या कळप आढळून येत आहेत. डुकरे कशामुळे मरू लागली आहेत, हे विच्छेदनानंतर स्पष्ट होईल. मात्र, वराह पालकांच्या बैठकी घेऊन यासंदर्भात त्यांना सूचना दिल्या जाणार आहेत. आरोग्य विभाग शहरातील वराह पालकांची बैठक घेणार असल्याचीदेखील माहिती आहे. याबाबत लवकरच तारीख निश्चित होईल.मृत डुकरांचे कळप अकस्मात आढळून येणे ही बाब गंभीर आहे. त्यामुळे मृत डुकरांचे विच्छेदन करुन त्यांच्या मृत्यूमुखी पडण्याची कारणे शोधण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहोचू नयेत, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देखील संबंधिताना देण्यात आल्या आहेत. - चरणजित कौर नंदा, महापौर, महापालिका.
वराहांच्या अचानक मृत्यूने महापौर हैराण
By admin | Published: August 31, 2015 11:55 PM