नागरिकांशी संवाद, त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन
अमरावती : महापौर चेतन गावंडे यांनी मंगळवारी कोरोनाचे ‘हॉट स्पॉट’ असलेल्या बडनेरा, दस्तुरनगर, यशोदानगर व विलासनगर परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला व त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन केले.
नगरसेवक प्रकाश बनसोड, नगरसेवक ललित झंझाड, नगरसेविका गंगा अंभोरे, सहायक आयुक्त भाग्यश्री बोरकर, आरोग्य निरीक्षक एकनाथ कुळकर्णी यांच्याशी यावेळी महापौरांनी चर्चा केली. जुनी वस्तीतील बारीपुरा येथे भेट दिली. या ठिकाणी गाड्यांमध्ये अंतर ठेवण्याच्या सूचना हॉकर्सना व नियमांचे पालन करीत नसतील, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, असे आरोग्य निरीक्षकांना निर्देश दिले. यावेळी अभियंता दीपक खडेकार, आरोग्य निरीक्षक मिथून उसरे उपस्थित होते.
दस्तुरनगर चौकात हॉकर्स जास्त असून, येथेही गाड्यांमध्ये अंतर ठेवण्याचे निर्देश महापौरांनी दिले. यशोदानगर चौकातील नागरिकांची गर्दी हटविण्याच्या सूचना त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या. लॉकडाऊन संपवायचा असेल, तर रुग्णांची संख्या कमी होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी ओळखून घरातच राहावे, असे ते म्हणाले. सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांनी सामजिक अंतर पाळावे, अन्यथा सदर दुकान बंद करण्यात यावे, असे निर्देश संबंधित यंत्रणेला त्यांनी दिले.