महापालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकवा, विकासकामांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा सल्ला
अमरावती : महापौर चेतन गावंडे यांनी नुकतीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष च्ंद्रकांत पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली आणि युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात घातलेल्या ‘गोंधळा’बाबत अवगत केले. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी विकासकामांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधा, महापालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकणार अशी तयारी ठेवा, भाजपच्या कुणी आडवे येत असेल तर त्याला जागा दाखविण्यास आपण सक्षम असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले, हे विशेष.
महापौर चेतन गावंडे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांची भेट घेताना त्यांना अमरावती शहरात भाजपची बांधणी, बुथ, वॉर्डनिहाय कमिट्या, आतापर्यतच्या विकासकामांची माहिती दिली. सध्या भाजपचे ४५ नगरसेवक महापालिकेत निवडून
आले आहेत. पुढील वर्षाच्या प्रारंभी महापालिकेची निवडणूक होण्याचे संकेत आहेत. त्याअनुषंगाने तयारी सुरू असल्याचे
महापौरांनी स्पष्ट केले. आतापर्यंत प्रभागनिहाय झालेल्या विविध विकासकामांची माहिती देताना महापौर गावंडे यांनी सर्वघटकांना न्याय दिल्याचे सांगितले. मात्र, आमदार रवि राणा यांच्याद्धारा स्थापित युवा स्वाभिमान संघटना ही भाजपला बदनाम करण्याची खेळी करीत असल्याची बाब महापौरांनी चंद्रकांत पाटलांच्या लक्षात आणून दिली. गत आठवड्यात महापालिका सभागृहात झालेला ‘गोंधळ’ हे त्याचे प्रतिक होते, असे महापौरांनी पाटलांना सांगितले. मात्र, कोण काय करते, याकडे लक्ष देऊ नका. जनतेशी बांधीलकी ठेवा. भाजपवर जनतेचा विश्वास आहे. तो कायम ठेवा आणि येणाऱ्या निवडणुकीच्या सामोरे जा, असे चंद्रकात पाटील यांनी आवर्जून सांगितले. भाजप तत्वविरोधी काेणी पाऊल उचलत असेल, तर त्याला प्रसंगी जागा दाखवून द्या, असेही पाटील यांनी महापौरांना म्हणाले. भाजपची जनतेसाेबत असलेली नाळ कायम ठेवा आणि भाजपचा झेंडा पुन्हा महापालिकेवर फडकविण्यासाठी राज्यातील भाजपचे नेते सोबत आहेत, असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी महापौर चेतन गावंडे यांना दिला.