चिखलदरा पोलिसांकडून चौकशीला वेग
चिखलदरा : तालुक्यातील सेमाडोह येथील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात चालविल्या जाणाऱ्या बनावट देशी-विदेशी दारू कारखान्यावर धाड टाकून अटक करण्यात आलेल्या सर्व दहा आरोपींना शनिवारी सायंकाळी अचलपूर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
अनेक दिवसांपासून सेमाडोह येथील सामाजिक न्याय विभागाच्या अनुदानित महाकाली वसतिगृहात अवैधरीत्या सुरू असलेल्या बनावट देशी-विदेशी दारूचा कारखान्यावर शुक्रवारी रात्री ग्रामीण पोलिसांनी धाड टाकली होती. यात बनावट दारूसाठी वापरण्यात येणाऱ्या मालासह १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींमध्ये वसतिगृह चालविणाऱ्या संस्थेचा अध्यक्ष गोलू मुंडे याच्यासह दहा जणांना पोलिसांनी अटक केली होती. शनिवारी सर्व आरोपींना अचलपूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. सेमाडोह येथून नजीकच्या मध्य प्रदेश व जिल्ह्यात या बनावट देशी-विदेशी दारूचा पुरवठा केला जात असल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे आली आहे. त्यासाठी स्थानिकांसह मध्यप्रदेशातील मजुरांना आणण्यात आले होते.
ग्रामस्थांमध्ये आश्चर्य, स्थानिक पोलीस अनभिज्ञ कसे?
बनावट दारूचा कारखाना थेट सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतिगृहात उघडण्यात आल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. येथे चिखलदरा पोलिसांची चौकीदेखील आहे. मात्र, स्थानिक पोलिसांऐवजी येथे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाड घातली. सेमाडोह येथे व्याघ्र प्रकल्पाचे पर्यटनस्थळ व जंगल सफारी असल्याने येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. आरोपींनी या बनावट दारूचा पुरवठा प्रत्यक्षात कुठे केला, याचा तपास केला जात आहे.