- अनिल कडूपरतवाडा (अमरावती) : पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत चिखलदरा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कस्टडीत असलेल्या मांडुळ सापाची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. ३६ दिवसांपासून हा मांडुळ साप वनविभागाच्या कस्टडीत आहे. वैद्यकीय अधिका-यांच्या फिटनेस सर्टीफिकेटनंतरच न्यायालयाच्या परवानगीने त्याला जंगलात सोडले जाणार आहे.मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात पोहोचलेला हा मांडूळ साप ११ डिसेंबरला मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत चिखलदरा वनपरिक्षेत्र अधिका-यांच्या हाती लागला होता. या मांडुळ सापासह नऊ आरोपींना पूर्व मेळघाट वनविभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. आरोपींकडून चौकशी करण्यात आली तरी मुख्य सूत्रधार अद्याप मोकळा आहे. दरम्यान, आठवड्यातून एक दिवस चिखलदरा वनपरिक्षेत्र अधिका-यांच्या कार्यालयात हजेरी लावण्याच्या अटीवर अचलपूर न्यायालयाने आरोपींना जामिनावर मोकळे केले. चौकशी अधिका-यांनी त्यांच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड मागवले असून, उपवनसंरक्षकांकडे तसा प्रस्ताव सादर केला आहे.माागील ३६ दिवसांपासून कस्टडीत असलेल्या मांडुळ सापाला जंगलात सोडण्याची परवानगी चौकशी अधिका-यांनी मागितली आहे. एका वनपालाच्या शासकीय निवासस्थानी नरम ओलसर काळ्या मातीसह पोत्यात हा मांडूळ साप मुक्कामाला आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून फिटनेस सर्टिफिकेट अचलपूर न्यायालयात सादर केले जाणार आहे. न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात येणार आहे. सापाची वैद्यकीय तपासणी, फिटनेस सर्टिफिकेट आणि जंगलात सोडण्याकरिता न्यायालयाची परवानगी पहिल्यांदाच बघायला मिळत आहे.मांडुळ सापाच्या वैद्यकीय तपासणीनंतर फिटनेस प्रमाणपत्र घेऊन न्यायालयाच्या परवानगीनंतरच त्याला जंगलात सुरक्षित सोडण्यात येईल. मिळालेल्या मोबाइल नंबरवरील कॉल रेकॉर्ड मागण्यात आले आहेत.- डी. के. मुनेश्वर,वनपरिक्षेत्र अधिकारी, चिखलदरा, पूर्व मेळघाट वनविभाग
मांडुळ सापाची वैद्यकीय तपासणी, फिटनेस सर्टिफिकेटनंतरच जंगलात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 4:55 PM