क्रान्तिज्योती ब्रिगेडचे आयोजन, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांंना ‘भारतरत्न’चा ठराव
वरूड : स्थानिक मीना बंदे आदर्श इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये क्रान्तिज्योती ब्रिगेडच्यावतीने फुले अनुयायांचा मेळावा नुकताच कोल्हे सभागृहात पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने फुले अनुयायांची उपस्थिती होती. महात्मा फुले यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा करण्याचा तसेच सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांंना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराबाबत पाठपुरावा करण्याचा ठराव घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्क्राणी शाळेचे माजी प्राचार्य रामराव वानखडे होते. उद्घाटक म्हणून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नंदेश अंबाडकर, स्वागताध्यक्ष नवयुवक संस्थेचे सचिव पुरुषोत्तम कळमकर, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. नीलकंठ यावलकर, ओमप्रकाश अंबाडकर, नंदेश वाठ, किरण मेहरे, प्रभाकर वानखडे, नितीन खेरडे, डॉ. श्रीकृष्ण गोरडे, युवराज आंडे, प्राचार्य संगीता गोरडे, नीलेश रडके, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर काळे, उमेश यावलकर, डॉ. मीना बंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
फुले अनुयायांच्या मेळाव्यात सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, ओबीसी आरक्षणाबाबत शासनाकडे पाठपुरावा, शिक्षणाचे पुरस्कर्ते आणि योगदान याचा विचार करून महात्मा फुले यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा करण्यात यावा, असा ठराव घेण्यात आला. यावेळी कोरोनाच्या नियमांचे पालन करून कार्यक्रम पार पडला. यावेळी ब्रिग्रेडच्या अनुयायांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत सहभाग घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले.
महिला शहराध्यक्ष म्हणून डॉ. प्रांजली कुऱ्हाडे यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजक विभागीय अध्यक्ष स्वप्निल आजनकर होते. विभागीय संघटक विनय चौधरी, कृषक आघाडीचे तालुकाध्यक्ष नंदकिशोर आजनकर, महिला जिल्हा उपाध्यक्षा संगीता बेले, तालुका संघटिका हिमानी आजनकर, गणेश लेकुरवाळे, पंकज लेकुरवाळे आदींनी मेळाव्याकरिता परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महात्मा फुले अनुयायांनी उत्स्फूर्त हजेरी लावली होती.