उपविभागीय अधिकारी लोणारकर यांनी वैद्यकीय व्यावसायिकांना कोविड-१९ संसर्ग शहरात पसरू नये याकरता काय खबरदारी घ्यायची, याबाबत मार्गदर्शन केले. शहरातील खासगी डॉक्टरांकडे जाणाऱ्या तापाच्या रुग्णांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात यावी. अशा रुग्णांना जर कोरोनासदृश लक्षणे आढळली, तर त्यांना गृह विलगीकरण किंवा कोविड केअर सेंटर येथे सरकारी वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. घरातील सर्व व्यक्तींची चाचणी करून घेण्यात यावी, रुग्ण तपासताना डॉक्टरांनी स्वतःची काळजी घ्यावी, जर जास्त गर्दी होत असेल, तर रुग्णांना वेळेनुसार तपासणीसाठी बोलवण्यात यावे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्यात यावा, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
याचप्रमाणे दर्यापूर तालुक्यातील सर्व मौलवी, मशिदींच्या विश्वस्तांची सभा तहसीलदार योगेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सूचना करण्यात आल्या. ४५ वर्षावरील सर्वांना लस उपलब्ध असून जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच जे नागरिक कोरोनाबाधितांच्याच्या संपर्कात आले असतील त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले .