अमरावती : सोयाबीनला १० हजार रुपये भाव कायमस्वरूपी मिळावा यासाठी केंद्र शासनाविरुद्ध आंदोलनाचा बिगुल सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत वाजला. रविवारी सकाळी शहरातील इर्विन चौकात ही बैठक झाली.
जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्यासह जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बैठकीला उपस्थित होते. केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात केलेली घट, सोयाबीन पेंडीची विदेशातून १२ लाख मेट्रिक टनाची आयात यामुळे देशांतर्गत सोयाबीनचा भाव गडगडला आहेत, अशी मांडणी प्रकाश साबळे यांनी केली. जुलै ते ऑगस्ट महिन्यात सोयाबीनला प्रतिक्विंटल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असा विक्रमी भाव होता. मात्र, त्यावेळी शेतकऱ्यांकडे सोयाबीन नव्हते. परिणामी या भावाचा व्यापाऱ्यांना फायदा झाला. शेतकऱ्याचे सोयाबीन आता बाजार समितीत विक्रीसाठी येत असताना अचानक चार ते पाच हजार रुपयांवर भाव आला आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येत सकाळी ११ वाजता बैठक घेतली. सोयाबीनला १० हजार रुपये भाव कायमस्वरूपी राहावा, असा निर्णय केंद्र सरकारने न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. याप्रसंगी अशोक सोनारकर, तुकाराम भस्मे, किरण महल्ले, अमित कुचे, प्रमोद कुचे, अमोल चवणे, नरेंद्र तायडे, बाळकृष्ण धर्माळे, महेश देशमुख आदी उपस्थित होते.
---------------
आज सर्वपक्षीय बंद
किमान हमीभावाचा कायदा केंद्र सरकारने अस्तित्वात आणावा या मागणीसाठी २७ सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय भारत बंदची हाक देण्यात आली आहे. अखिल भारतीय किसान समन्वय संघर्ष समितीच्या नेतृत्वात समविचारी पक्ष, संघटना या बंदमध्ये सहभागी होतील.