चिखलदरा (अमरावती), दि. 17 - मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या आठ गावांतील हजारो आदिवासींच्या समस्यांवर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत बैठक बोलविण्यात आली आहे. पुनर्वसित वस्त्यांमधील गैरसोयींना कंटाळून काही दिवसांपूर्वी मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वात शेकडो आदिवासी त्यांच्या मूळगावी परतले होते. त्यामुळे प्रशासनाची प्रचंड तारांबळ उडाली होती.
चिखलदरा तालुक्यातील सोमठाणा खुर्द, सोमठणा बु., केलपाणी, अमोना, नागरतास, गुल्लरघाट, धारगड व बारूखेडा या आठ गावांचे व्याघ्र प्रकल्पांच्या गाभाक्षेत्रातून सन २०११ ते २०१५ या वर्षात टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्यात आले. मात्र, मेळघाटप्रमाणे त्यांना कुठल्याच मूलभूत सुविधा देण्यात आल्या नाहीत. यामुळे आदिवासींमध्ये प्रचंड संताप उफाळून आला. अखेरीस १६ आॅगस्ट रोजी माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वात बैठक घेऊन ९ सप्टेंबर रोजी सर्व आदिवासी मूळगावी परतीचा निर्णय घेतला होता. व्याघ्र प्रकल्पासह महसूल विभागाने याआंदोलनाचा धसका घेतला होता. आदिवासींना रोखण्यासाठी प्रचंड पोलीस ताफा तैनात करण्यात आला होता. मात्र, तरीही आदिवासींनी खटकाली नाक्याचे कुलूप तोडून मुळगावी प्रवेश केला होता. या प्रकारामुळे शासनाला खडबडून जाग आली. अकोला व अमरावतीच्या जिल्हाधिकाºयांनी १० सप्टेंबर रोजी दिवसभर आदिवासींची मनधरणी केली. मात्र, त्याचा काहीही फायदा झाला नाही. अखेर मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी यांनी राजकुमार पटेल यांचे मन वळवून समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन देत आदिवासींना पुनर्वसित गावी परत नेले होते.
आज मुख्यमंत्री घेणार आढावापुनर्वसित आदिवासींच्या सर्व समस्यांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी मुंबईत ऐकणार आहेत. या बैठकीला अमरावतीचे आ.सुनील देशमुख, माजी आमदार राजकुमार पटेल, पाणीपुरवठा, महसूल, ग्रामविकास, वने, आदिवासी विभागाचे सचिव, अकोला व अमरावतीचे जिल्हाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
दोन्ही आमदार बेपत्ता?मेळघाटचे आ. प्रभूदास भिलावेकर व अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना या बैठकीला आमंत्रित करण्यात आलेले नाही, हे पत्रावरून स्पष्ट झाले आहे. पुनर्वसित गावात आ.भिलावेकर पोहोचताच आदिवासींनी प्रश्नांचा भडीमार केला होता. त्यानंतर ते इकडे फिरकलेच नाहीत, असे आदिवासींचे म्हणणे आहे.