अमरावती : क्लास वन मुख्याधिकारी असलेल्या मेघा वासनकर यांनी शुक्रवारी महापालिका उपायुक्त (प्रशासन) पदाचे सुत्रे स्विकारली. वासनकर यांच्या रूपाने सात महिन्यानंतर उपायुक्तपदी प्रतिनियुक्तीचे अधिकारी रूजू झाले आहेत.
प्रतिनियुक्तीचे अधिकारी सुरेश पाटील हे ऑगस्ट २०२२ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या पदाचा प्रभार सहायक आयुक्त भाग्यश्री बोरेकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र, त्या देखील १३ फेब्रुवारी रोजी वैद्यकीय रजेवर गेल्या. त्यामुळे ते पद रिक्त होते. त्या पदावर नगरविकास विभागाने ९ मार्च रोजी मेघना वासनकर यांच्या बदलीचे आदेश काढले होते. त्यानुसार वासनकर या शु्क्रवारी सकाळीच महापालिकेत रूजू झाल्या.
मुळच्या परतवाडा कांडली येथील वासनकर यांनी सन २००८ च्या एमपीएससी पासआऊट केल्यानंतर कळमेश्वर, चांदूररेल्वे, देवळी, पुलगाव, वर्धा व अकोट येथे मुख्याधिकारी म्हणून काम केले आहे. याशिवाय त्यांनी अमरावती विभागीय आयुक्तालयात देखील जबाबदारी सांभाळली आहे. आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या नेतृत्वात लोकाभिमुख प्रशासन चालविण्यावर भर असेल, असे उपायुक्त वासनकर यांनी ‘लोकमत’सांगितले.