चिखलदरा/परतवाडा : बुधवारी मध्यरात्री मुसळधार बरसलेल्या पावसामुळे मेळघाटच्या धारणी-चिखलदरा तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आदिवासी पाड्यांना जोडणारे अनेक मार्ग बंद पडले असून, नदी-नाल्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने परतवाडा-इंदूर आंतरराज्य महामार्गही बंद पडला.
मेळघाटात बुधवारी मध्यरात्रीपासूनच ढगफुटीप्रमाणे मुसळधार पाऊस धो-धो कोसळला. त्याचा फटका आदिवासी पाड्यांना, तालुका मुख्यालय व आंतरराज्य महामार्गाला बसला. गुरुवारी दुपारपर्यंत पूर्णतः वाहतूक ठप्प होती. सेमाडोह येथे सिपना नदीने रौद्र रूप धारण केल्याचे दिसून आले. येथील भूतखोरा आणि निसर्ग निर्वाचन संकुलकडे जाणारे दोन्ही मार्ग बंद होते. सिपना नदीवरील या दोन्ही पुलांवर नदीच्या पूरस्थिती मुळे पाणी ओसंडून वाहत होते. परतवाडा-धारणी-इंदूर मार्ग बंद होता. सेमाडोह गावात अनेक झाडे उन्मळून पडल्याने विद्युत खांबसुद्धा वाकून कोसळले, तार तुटल्या. परिणामी विद्युत पुरवठा पुरवठा खंडित झाला. दुसरीकडे घटांग ते काटकुंभ-डोमा मार्गावर कुकरूनजीक दरड कोसळली, तर सलोना ते चिखलदरा मार्गावर झाड उन्मळून पडले. त्यामुळे दोन्ही ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती. जामूननाला-कामापूर गावानजीक उन्मळून पडलेले झाड सार्वजनिक बांधकाम विभागाऐवजी सलोना येथील रस्त्याने जाणारे कैलास हरसुले, राजा शेळके, नरेश वाघमारे, राजेश कासदेकर, योगेश शेलके, बबलू झमरकर या युवकांनी कापून बाजूला केले व रेशन धान्य घेऊन जाणाऱ्या वाहनासह सिलिंडर व प्रवासी वाहतूक सुरळीत झाली
बॉक्स
सिपना, शहानूर, चंद्रभागाचे रौद्र रूप
मेळघाटात धो-धो कोसळलेल्या पावसामुळे सिपना व चंद्रभागा या दोन्ही नद्यांचे रौद्र रूप व गुरुवारी पहाटेपासूनच आदिवासींचा रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांना पाहायला मिळाले. धामणगाव गढी ते खोंगडा या मार्गावर चिचाटीनजीकच्या जामूननाला नदीला पूर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बऱ्याच काळापर्यंत ठप्प होती. आकी गावानजीक शहानूर नदीला पूरस्थिती होती. मेळघाटात पाण्यामुळे सर्वत्र हाहाकार दिसून आला.
बॉक्स
घराची भिंत कोसळली, माखला मार्ग बंद
तालुक्यातील सोमवारखेडा पुलावर पाणी असल्याने मार्गावरील वाहतूक ठप्प होती. दुसरीकडे बोराळा भिलखेडा येथील बळीराम जामकर यांच्या घराची भिंत कोसळली. सेमाडोह-माकडा मार्गावरील मांगा देवजवळ दरड कोसळल्याने हा मार्गसुद्धा बंद होता.
कोट
तालुक्यातील अनेक मार्ग मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे बंद आहेत. बोराळा भिलखेडा येथे एका घराची भिंत कोसळली असून अधिक माहिती घेणे सुरू आहे.
- माया माने, तहसीलदार, चिखलदरा