कसे होणार मेळघाटात बालमृत्यू कमी? पंधरा दिवसांसाठीही फिरकले नाहीत स्त्रीरोग व बाल रोग तज्ञ
लोकमत रिॲलिटी चेक
नरेंद्र जावरे - चिखलदरा : पावसाळ्याच्या दिवसात मेळघाटातील कुपोषित बालक गर्भवती व स्तनदा मातांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी स्त्रीरोग आणि बालरोगतज्ज्ञ यांची सेवा मिळावी, यासाठी पंधरा दिवसांसाठी नियुक्त करण्यात आलेले जिल्ह्याबाहेरील काही तज्ज्ञ डॉक्टर मेळघाटात फिरकलेच नाहीत. ही धक्कादायक बाब लोकमतच रिॲलिटी चेकमध्ये उघड झाली आहे. सक्त आदेशांनाही हे डॉक्टर जुमानले नसल्यामुळे मेळघाटातील आदिवासी रुग्णांचा वाली कोण, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे
मेळघाटात पावसाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात बालमृत्यू व साथरोग पसरत असल्याने आदिवासी गर्भवती तसेच स्तनदा मातांचे शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना अतिदक्षतेखाली ठेवले जाते. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञ डॉक्टरच नसल्याची ओरड पाहता १५ दिवसांसाठी धारणी व चिखलदरा तालुक्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आदी जिल्ह्यांतून त्यांची नियुक्ती केल्या जाते २७ ऑगस्ट ते १० सप्टेंबर पर्यंत अकोला येथील आरोग्य उपसंचालकांनी सलोना, बिजूधावडी टेम्ब्रूसोंडा,कलमखार,साद्रावाडी येथे नियुक्ती केली होती. यातील अनेक डॉक्टर आले नाही, तर काही दोन दिवस हजेरी लावून बेपत्ता झाले.
बॉक्स
उपसंचालकांचे हे सक्त आदेश
वैद्यकीय अधिकाऱ्यांना संबंधित सेवा कालावधीत रजा मंजूर करता येणार नाही तसेच या आदेशात कोणताही बदल होणार नाही. ते रुजू न झाल्यास वा गैरहजर राहिल्यास या कालावधीचे वेतन अदा करण्यात येऊ नये. तसे झाल्यास वेतन अदा करणाऱ्या कार्यालयप्रमुखाच्या वेतनातून वसुली करण्यात येईल. त्यांनी गैरवर्तन केल्याचे समजून महाराष्ट्र नागरी सेवा नियम (शिस्त व अपिल) १९७९ अन्वये कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, असे आदेश आरोग्य उपसंचालक राजकुमार चव्हाण यांनी नियुक्तिपत्रात दिले होते.
--------------
जे आले ते गेले
धारणी व चिखलदरा तालुक्यातील कळमखार, सलोना, टेंब्रुसोंडा, बिजुधावडी, साद्राबाडी आरोग्य केंद्रात प्रत्येकी एक बालरोग व स्त्रीरोग तज्ज्ञ अशा दहा तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यापैकी बिजूधावडी आरोग्य केंद्रात बालरोगतज्ज्ञ अमोल नाफडे बुलढाणावरून दोन दिवस आले नि निघून गेल्याचे वैद्यकीय अधिकारी दिनेश अंभोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. साद्राबाडी आरोग्य केंद्रात बालरोगतज्ज्ञ स्वप्निल खडसे, सलोना व टेंब्रुसोंडा येथे स्त्रीरोगतज्ज्ञ बुधवारपर्यंत आले नव्हते.
---------------
नियुक्त तज्ज्ञ डॉक्टरांपैकी जे अनुपस्थित आहेत, त्यांचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येणार आहे.
- आदित्य पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा