अमरावती : उन्हाळ्यात तृष्णा भागविण्यासाठी वाघ दरदिवशी १५ ते २० किमी अंतरचा प्रवास करतो. नेमकी हीच बाब हेरून तस्कर नैसर्गिक वा कृत्रिम पाणवठ्यांमध्ये युरिया अथवा विषप्रयोगाद्वारे वाघांची शिकार करतात. त्यामुळे आता वन्यजीव विभागाने व्याघ्र प्रकल्पानजीकच्या गावांमध्ये खबऱ्यांची मोठी फौज उभारली असून, गावात कोणीही अनोळखी व्यक्ती दिसल्यास ‘अलर्ट’ करण्याचा सूचना दिल्या आहेत.
वाघ अथवा अन्य वन्यजीवांच्या शिकारीसाठी तस्करांकडून वेगवेगळे प्रयोग केले जातात, असा वन्यजीव विभागाचा आतापर्यंतचा निष्कर्ष आहे. दरवर्षी मार्च ते जून या चार महिन्यांत शिकारी व्याघ्र प्रकल्पनजीकच्या गावात स्थानिकांना हाताशी घेऊन वाघांसंदर्भात रेकी करतात. स्थानिक रहिवाशांकडून माहिती मिळविल्यानंतर वाघांची शिकारी केली जाते.
मात्र, वन्यजीव विभागाने यावर्षी व्याघ्र प्रकल्पानजीकच्या गावांना लक्ष्य केले आहे. खबऱ्यांची फौज निर्माण केली असून, गावात कोणी अनोळखी वा परप्रांतीय व्यक्ती दृष्टीस पडल्यास अशांची माहिती वनविभागाला देण्याबाबत अवगत करण्यात आले आहे. वाघांची रेकी वा शिकार करण्याच्या मनसुब्याने आलेली व्यक्ती वनविभागाने जेरबंद केल्यास या मोबदल्यात संबंधित खबऱ्यांना योग्य बक्षीस देण्याचे वन्यजीव विभागाचे प्रयोजन आहे. यासंदर्भात वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत.
पाणवठ्यावर लागणार ट्रॅप कॅमरे
मेळघाट, ताडोबा-अंधारी, पेंच, नवेगाव- नागझिरा, बोर अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गक वा कृत्रिम पाणवठ्यांच्या परिसरात वाघ अथवा अन्य वन्यजीवांच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार आहे. पाणवठ्यांवर विषप्रयोग किवा युरिया मिश्रित करून वाघांच्या शिकारीचा डाव ट्रॅप कॅमेऱ्यातून उघडकीस आणता येणार आहे. त्याअनुषंगाने पाणवठ्यांवर ट्रॅप कॅमेरे बसविण्याचा हालचालींनी वेग घेतला आहे. यंदा नव्याने २५०० पाणवठे तयार करण्यात आले आहे.‘त्या’ गावातृून आदिवासींचे रोजगारासाठी स्थलांतर
मेळघाट, ताडोबा-अंधारी, पेंच, नवेगाव-नागझिरा या व्याघ्र प्रकल्पानजीकच्या बहुतांश गावात आदिवासींचे वास्तव्य आहे. मात्र, उन्हाळा सुरू होताच आदिवासी कुटुंब हे रोजगारासाठी स्थलांतरित होतात. आदिवासी हे जूनपर्यंत स्थलांतरित असतात. नेमक्या याच काळात तस्करांकडून वाघांच्या शिकारीचे प्लॅन तयार केले जातात. वाघांची रेकी, वाघांचे भ्रमणमार्ग, पाणवठ्यांवर ये-जा आदी माहिती स्थानिकांकडून तस्कर मिळवितात. त्यामुळे वन्यजीव विभागाने स्थानिकांना विश्वासात घेतले आहे.