अमरावती : मेळघाटच्या गोल्ड मेडलिस्टसाठी सोशल मीडियावर मदतीची याचना करण्याची वेळ मित्रमंडळींवर आली आहे. या क्रीडापटूची दक्षिण कोरियातील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या पंखांना बळ देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मेळघाटातील नागरिक व आदिवासी बांधवांकडून होत आहे.
पाचवीला पुजलेल्या गरिबीशी झगडत मेळघाटचा आदिवासी युवक सोनकलाल उर्फ सोनू केंडे बेठेकर (रा.रायपूर, ता.चिखलदरा) याने वॉकिंग स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले. त्याची दखल घेत, मास्टर गेम फेडरेशन इंडियातर्फे दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. मात्र, या स्पर्धेत सहभाग होण्यासाठी आर्थिक चणचण पुढे आली. त्यामुळे त्याच्या पंखांना बळ देण्यासाठी मित्रमंडळींनी सोशल मीडियावर मदतीची हाक दिली आहे.
सोनकलालने एमए (इंग्रजी), डीएड केले आहे. सध्या नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे श्रीराम शिक्षण संस्थेत शिक्षकेतर कर्मचारी म्हणून तो कार्यरत आहे. त्याचे आई-वडील व भाऊ तुटपुंजी शेती करतात. दोन बहिणींचे लग्न झाले आहे. घरची परिस्थिती हलाखीची आहे. मागील आठ वर्षांपासून सोनकलाल युवकांना व्हॉलीबॉलसह इतरही खेळांचे प्रशिक्षण नि:शुल्क देत आहे.
मैदानात पदकांची लयलूट
घरातील आर्थिक स्थिती बेताची सल्याने दोन वर्षे सोनकलालने मेळघाटात परतून फोटोग्राफीचा व्यवसाय केला. त्यानंतर, उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे पाचव्या मास्टर सीनियर राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण व तीन किलोमीटर स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. औरंगाबाद येथे राज्यस्तरीय तिसऱ्या प्रौढ चालण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदकासह विविध स्पर्धांमध्ये त्याने अनेक पदके पटकावली आहेत.
कोरियातील स्पर्धेचे वेध
दक्षिण कोरियात ११ ते २० मे दरम्यान ॲथलेटिक्स स्पर्धा होणार आहे. त्यामध्ये सोनकलाल हा लांब उडी, पाच किलोमीटर वाॅकिंग अशा विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहे.
शासनाच्या योजना कुणासाठी?
राज्य व केंद्र शासनाच्या आदिवासी युवकांना विविध क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी शेकडो योजना आहेत. सोनकलालच्या अनुषंगाने या योजना आणि त्यावर होणारा कोट्यवधींचा खर्च कुणासाठी, असा सवाल पुढे आला आहे.