अमरावती : रोहित बेलसरे हा मेळघाटच्या पायथ्याशी आलेल्या अचलपूर तालुक्यातील नयाखेडा (जांभळा) नावाच्या छोट्याशा आदिवासी गावाचा युवक अमरावती येथे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात शिक्षण घेतो. परिस्थिती बेताची असल्याने सुटीच्या दिवशी व रात्री केटरिंगमध्ये कामाला जातो. या पठ्ठ्याने गाझियाबाद येथे झालेल्या १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावीत सुवर्णपदक मिळविले.
मेळघाट विधानसभा मतदारसंघात अचलपूर तालुक्यातील नयाखेडा (जांभळा) येथील रोहित रामराव बेलसरे (१९) हा विद्यार्थी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात बी.ए. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. घरात आईवडील, तिघे भाऊ असा परिवार आहे. आईवडील स्वतः दुसऱ्यांच्या शेतावर मजुरीला जातात. त्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच. रोहित सर्वांत मोठा. दोघे लहान भाऊ शिक्षण घेतात. रोहित पाचवीपर्यंत गावात, दहावीपर्यंत परसापूर यथील जनता विद्यालयात, तर बारावीचे शिक्षण तेलखार येथील गुरुदेव महाविद्यालयातून घेतले. त्यानंतर श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात त्याने योगा व बी.ए. साठी प्रवेश घेतला. धावण्याच्या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळाल्याने त्याच्या कौतुकाने नयाखेडा प्रकाशात आले आहे.
इंटरनॅशनलची तयारी
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली रोहित बेलसरे याने वीस वर्षांखालील पंधराशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. ८ ते १० एप्रिल रोजी गाझियाबाद येथील महामाया स्टेडियमवर ही स्पर्धा झाली. आता नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तो तयारी करीत आहे. धावून काय मिळणार, असे म्हणणाऱ्यांना माझ्या यशाने उत्तर दिले आहे. अजूनही भरपूर परिश्रम घ्यायचे आहेत, असे रोहित बेलसरे म्हणतो.