अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांची वैयक्तिक डायरी वाचून वनविभागाची तपासणी समितीदेखील सुन्न झाली. दीपाली यांच्या आत्महत्याप्रकरणी मुख्य आरोपी विनोद शिवकुमार याच्या अन्यायाबाबतची यात नोंद असून, मेळघाटात महिला वनकर्मचाऱ्यांना कसा त्रास दिला जातो, याविषयी वास्तव लिहिले आहे.
दीपाली यांनी २५ मार्च रोजी गोळी झाडून आत्महत्या केली. याप्रकरणाने संपूर्ण वनविभाग हादरून गेला आहे. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. साईप्रसाद यांनी ३१ मार्च रोजी दीपाली यांच्या मृत्यूप्रकरणी तपासणी करण्यासाठी वनविभागाची नऊ सदस्यीय समिती गठित केली. या समितीने ११ व १२ एप्रिल रोजी मेळघाटसह अमरावतीत दौरा केला. या मुख्य समितीने तपासणीच्या अनुषंगाने तीन उपसमित्या तयार केल्या. त्यापैकी एका उपसमितीत वनविकास महामंडळाच्या मुख्य महाव्यवस्थापक मीरा (अय्यर) त्रिवेदी, सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी किशोर मिश्रीकोटकर व अमरावतीच्या सहायक वनसंरक्षक ज्योती पवार यांचा समावेश आहे. या समितीने १२ एप्रिल रोजी हरिसाल येथील दीपाली यांचे कार्यालय, निवासस्थानी भेट दिली. काही वनकर्मचाऱ्यांशी संवाद, चर्चा केली.
दरम्यान, तपासणी समितीला दीपाली यांची वैयक्तिक दैनंदिनी (डायरी) आढळून आली. या डायरीत दीपाली यांनी विनोद शिवकुमार याच्या मानसिक, शारीरिक त्रासाची नोंद केली आहे. ही डायरी वाचून समितीमधील महिला सदस्यदेखील सुन्न झाल्यात. मेळघाटात महिला वनकर्मचाऱ्यांना त्रास देण्याची परिसीमा विनोद शिवकुमार याने ओलांडल्याचे मत या समितीचे आहे. विनोद शिवकुमार हा ‘रूद्र’ वायरलेसवरून दीपाली यांना लगेच येण्याचे मॅसेज द्यायचा. दीपाली या वाहनाने हरिसाल येथून चिखलदरा येथे मुख्यालयी जाण्यासाठी निघाल्या की, शिवकुमार हा लगेच १५ ते २० मिनिटांनी आता येऊ नका, काम झाले, असे म्हणत त्यांना परत पाठवित हाेता. असा प्रकार एकदा नव्हे, तर महिन्यातून दोन ते तीन वेळा शिवकुमार करीत होता. गर्भधारणा झाल्यानंतर हा प्रकार वाढतच गेला, अशी दीपाली यांनी नोंद करून ठेवली आहे. दीपाली यांनी वैयक्तिक डायरीत मांडलेली व्यथा वाचून समितीने खरेच मेळघाटात महिला वनकर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावणे ‘चॅलेंजिंग’ असल्याचा अभिप्राय नोंदविला आहे.
--------------------
तपासणीदरम्यान समिती सदस्यांचा मोबाइल ‘स्वीच ऑफ’
दीपाली यांच्या मृत्यूप्रकरणी वनविभागाने स्वतंत्रपणे तपासणी करण्यासाठी गठित केलेल्या नऊ सदस्यीय समितीचे अध्यक्ष अथवा सदस्यांचे मोबाईल तपासणीदरम्यान ‘स्वीच ऑफ’ राहतात. तशी स्वत:हून समितीने गाईडलाईन नेमून ठेवली आहे. तपासणीकामी असताना काेणाचेही मोबाइल सुरू राहणार नाही, असे निश्चित केले आहे. याची प्रचिती १२ एप्रिल राेजी मेळघाट दौऱ्यात दिसून आली.
------------------
नागपूर येथे समितीची आढावा बैठक
दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी नऊ सदस्यीय समितीचे गठण झाले. या समितीचा पहिला दौरा आटोपला आहे. पहिल्या दौऱ्यात समितीला नेमके काय आढळून आले, याबाबत आढावा घेण्यासाठी १९ एप्रिल रोजी नागपूर येथे प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. साईप्रसाद यांनी बैठक बोलावली आहे. समितीचे अध्यक्ष, सदस्य नागपूर येथे उपस्थित होण्यासाठी पोहोचले. मात्र, या आढावा बैठकीत वनविभागाची काय भूमिका ठरली, हे कळू शकले नाही.