वाघांचा सर्वोत्कृष्ट नैसर्गिक अधिवास, २७०० चौरस किलोमीटर क्षेत्र, ५० वाघ, २२ छावे
अनिल कडू
परतवाडा (अमरावती) : वाघांसह वन्यजिवांच्या संरक्षण व संवर्धनात अग्रेसर ठरलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला सोमवारी ४६ वर्षे पूर्ण झाली. देशातील पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांमधील एक सर्वात मोठा आणि महाराष्ट्रातील पहिला मेळघाट व्याघ्र प्रकल्प वाघांचा सर्वोत्कृष्ट नैसर्गिक अधिवास ठरला आहे. २२ फेब्रुवारी १९७४ ला अस्तित्वात आलेला हा व्याघ्र प्रकल्प वाघांच्या प्रजननास व वास्तव्यास अनुकूल ठरला आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आज ५० वाघ आहेत. यात २१ मादी आणि २९ नर आहेत. याव्यतिरिक्त २२ छावे आहेत. शंभर वाघांचा सांभाळ करण्याची क्षमता या प्रकल्पाची आहे. व्याघ्र संवर्धनात स्थिरावलेल्या या व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ २ हजार ७०० चौरस किलोमीटर आहे. यात ३६१.२८ चौरस किलोमीटरचे गुगामल राष्ट्रीय उद्यान समाविष्ट आहे. एका वाघाला साधारणत: २५ चौरस किलोमीटरचे क्षेत्र लागते. या अनुषंगाने शंभरहून अधिक वाघ मेळघाटात वास्तव्य करू शकतात. मेळघाटातील नर, मादी आणि छावे विचारात घेता, सध्या मेळघाटात लहान-मोठे ७२ वाघ वास्तव्यास आहेत.
४६ वर्षाच्या आपल्या यशस्वी कारकिर्दीत मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील व्यवस्थापन आणि जंगल सर्वोत्कृष्ट ठरले आहे. एनटीसीच्या मूल्यमापन समितीच्या निष्कर्षात हा व्याघ्र प्रकल्प व्हेरी गुड श्रेणीत आहे. बदलत्या परिस्थितीनुसार मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील व्यवस्थापन व उपाययोजनाही बदलत आहेत. वाघ आणि वाघांच्या नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवण्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या परिणामकारक उपाययोजना राबविल्या जात आहेत. दरम्यान, व्याघ्र संवर्धन व संरक्षणात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. पर्यटनाच्या अनुषंगानेही व्याघ्र प्रकल्प अग्रेसर ठरला असून, मध्य भारतातील पहिली हत्ती सफारी कोलकास येथे उपलब्ध आहे.
सायबर सेल
व्याघ्र प्रकल्पासाठी २०१३ मध्ये स्थापन झालेल्या वाईल्ड लाईफ क्राईम अँड सायबर सेल देशपातळीवरील पहिलाच प्रयोग आहे. देशपातळीवर जवळपास अडीचशे शिकारी, चोरट्यांना सायबर सेलने पकडून दिले. प्रकल्पाच्या इतिहासात पहिल्यांदा वनरक्षक आकाश सारडांना केंद्र सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. डिसेंबर २०१८ मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची पुनर्रचना आणि एकछत्री नियंत्रणास मान्यता मिळाली आहे.
स्मरणातील घटना
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सेमाडोह येथे लोकआग्रहास्तव भोला नामक हत्तीने १६ मार्च २००५ ला प्राण त्यागले होते. ४ ऑगस्ट २०१० ला जारिदा येथे अस्वलाच्या हल्ल्यात चार इसमांचा मृत्यू झाल्यानंतर या अस्वलाला एसआरपीएफ जवानांनी ७ ऑगस्ट २०१० ला गोळ्या घातल्या.
—————————————