अमरावती : धारणी तालुक्यातील घोटा, हरिसाल, चौराकुंड येथील १४ मजुरांची धारणी पोलिसांनीकोल्हापूर येथून सुटका केली. या मजुरांना ऊसतोडणीसाठी नेण्यात आले होते. तेथे त्यांना डांबून ठेवून दररोज जबर मारहाण करण्यात येत होती. धारणी तालुक्यातील घोटा, हरिसाल व चौराकुंड येथील १४ मजूर पोहरा गावातील प्रेमलाल सोनाजी धांडे (५६) हा कोल्हापूर येथे साहेबराव दामू जाधव (४०, रा. अडई हिंगणी, ता. धारूर, जि. सातारा) याच्यामार्फत जगन्नाथ दत्रातय पाटील (५०, रा. जुने पारगाव, जि. कोल्हापूर) यांच्या शेतात नोव्हेंबर महिन्यात घेऊन गेला. तेथून प्रेमलाल हा पसार झाला. साहेबरावने मजुरांकडून काम करून घेणे सुरू केले. मजुरांनी त्यांच्या मजुरीबाबत विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडून दिवस-रात्र काम करून घेण्यात आले. याशिवाय त्यांना उपाशी अवस्थेत डांबून ठेऊन मारहाण करण्यात आली. त्यांच्याकडील मोबाइल हिसकून घेण्यात आले.
डांबून ठेवण्यात आलेल्या एका मजुराने लपून-छपून वडील सीताराम दारसिंबे यांना याबद्दलची माहिती दिली. सीताराम दारसिंबे यांच्या तक्रारीवरून प्रेमलाल धांडेविरोधात भादंविचे कलम ३७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक विलास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यासाठी पीएसआय रामरतन चव्हाण, रवि पाखरे, संजय खाडे यांची चमू कोल्हापूरला रवाना झाली. लोकेशन मिळाले गुरुवारी पोलीस चमूने एका मजुराशी फोनवर संपर्क करून शेताचे लोकेशन जाणून घेतले. पोलिसांनी त्याने सांगितल्यानुसार जुने पारगाव येथील स्मशनभूमीजवळील भावपूर्ण श्रद्धाजंलीच्या फलकानजीक असलेले उसाचे शेत गाठले.
पोलिसांविरोधात जमावशेतात असलेल्या साहेबराव जाधव, महेंद्र डोइजड, अरविंद पाटील यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. तसेच मोठ्या संख्येने जमाव उभा केला. त्यांच्या तावडीतून धारणी पोलिसांनी मजुरांची सुटका केली आणि धारणीला रवाना झाले.
आरोपींना राजकीय पाठबळमजुरांना डांबून ठेऊन त्यांना मारहाण करणाऱ्या प्रेमलाल दारसिंबे, साहेबराव जाधव, महेंद्र डोइजड, अरविंद पाटील यांना कोल्हापुरातील राजकीय पुढाऱ्यांचे पाठबळ असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांनी धारणी पोलिसांवर गुंडांमार्फत दबाव निर्माण केला होता. परंतु, वेळेवर त्यांना वडगाव (जि. कोल्हापूर) पोलिसांची मदत लाभली.